ग्रामस्थांची विजवितरण कार्यालयावर धडक
बांदा/प्रतिनिधी
तांबोळी गावात गेले दहा दिवस बत्ती गुल असल्याने गाव अंधारात आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी कल्पना देऊनही पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याने आज ग्रामपंचायत सदस्य मिलिंद देसाई यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी बांदा महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. मात्र अधिकारीच उपस्थित नसल्याने येत्या सोमवारी तांबोळी गाववासीयानी कार्यालयासमोर बसून ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
तांबोळी गावातून जाणाऱ्या वीज वितरणच्या मुख्य लाईनवर महावितरण कार्यालयाने झाडाझुडपांची सफाई न केल्याने पावसाळ्यात तांबोळी वासियांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जीर्ण झालेल्या वीज वाहिन्यांमुळे वीज वाहक तारा तुटण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे अनेक दिवस वीज नसल्याने ग्रामस्थांना अंधारात दिवस काढावे लागत आहेत.
बांदा महावितरणचे अधिकारी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याने स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. येत्या दोन दिवसात गावातील विजेच्या समस्यांचे निराकरण न केल्यास येत्या सोमवारी महावितरण कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य मिलिंद देसाई यांनी दिला आहे. येथील विजेच्या समस्यासंदर्भात ग्रामपंचायतच्या वतीने मे महिन्यात निवेदन देण्यात आले होते. मात्र दखल घेण्यात न आल्याने संताप व्यक्त होत आहे.
यावेळी शुभम पोपकर, नितीन सावंत, मुन्ना गावडे, उत्तम सावंत, दिलीप सावंत, मित्तल देसाई, श्रीरंग सावंत, अभी कदम, प्रथमेश सावंत, माजी उपसरपंच गणपत सावंत, तेजस सावंत, रवींद्र देसाई आदी उपस्थित होते.
फोटो :-
बांदा महावितरण कार्यालतात धडक दिलेले तांबोळी ग्रामस्थ. (छायाचित्र – निलेश मोरजकर)
