कामगार मंडळे, समित्यांचे पुनर्गठन करा

भारतीय मजदुर संघाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

ओरोस ता.१७-:

महाराष्ट्रातील कामगारांच्या कल्याणासाठी आणि विविध कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारने विविध मंडळे व समित्यांचे गठन करावे, अशी कायद्यामध्ये तरतूद आहे. त्यानुसार वेळोवेळी त्यांचे गठन करणे आवश्यक असते. परंतु नऊ मंडळे व समित्यांची मुदत तीन वर्षापेक्षा जास्त काळापासून संपलेली असताना या समित्यांचे व मंडळाचे पुनर्गठन सरकारने केलेले नाही. या समित्या तात्काळ पुनर्रचित कराव्यात, असा ठराव रायगड जिल्ह्यातील उरण येथे झालेल्या भारतीय मजूर संघ पश्चिम क्षेत्राच्या दोन दिवसीय बैठकीत घेण्यात आला आहे. त्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यासाठी आज जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्ग अध्यक्ष विकास गुरव, कोषाध्यक्ष सुधीर ठाकूर, सचिव सत्यविजय जाधव, भगवान साटम, अशोक घाडीगावकर, जयश्री मडवळ आदी उपस्थित होते. भारतीय मजदूर संघ पश्चिम क्षेत्राची दोन दिवशीय बैठकीचे आयोजन ८ व ९ जुलै २०२२ रोजी रायगड जिल्ह्यातील उरण येथे करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रातील असंघटित कामगार क्षेत्रातील सर्व कल्याणकारी मंडळांची पुनर्रचना करून त्यांना सक्रिय करावे, असा ठराव घेण्यात आला. या ठरावाची प्रत जोडत मागणी करणारे निवेदन आज जिल्हा प्रशासनाला संघटनेच्यावतीने देण्यात आले.

You cannot copy content of this page