लोकप्रतिनिधीनी बांधकाम विभागाचे लक्ष वेधावे: ग्रामस्थांची मागणी
⚡मालवण ता.१७-: मालवण तालुक्यातील ओझर- कातवड रस्ता खड्डेमय बनल्याने या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या ग्रामस्थ दुचाकीस्वारांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरावस्थेबाबत लोकप्रतिनिधीनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
ओझर नाका येथून कातवडच्या दिशेने जाणारा साधारण एक किमी लांबीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करत या रस्त्यावरून जावे लागत आहे. रस्त्यांवर पथदीप नसल्याने रात्रीच्यावेळी दुचाकीस्वारांचा अपघात होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
