गोनिदा दुर्गवारी दिनाचे साधले औचित्य
मालवण (प्रतिनिधी)
‘गोनीदा दुर्गवारी दिना’चे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश नारकर व त्यांचे सहकारी आरोसकर यांनी नांदोस गडाला भेट दिली. शिवकालीन परंपरा लाभलेल्या नांदोस गावासह नांदोस गडाचा इतिहास पर्यटनदृष्ट्या प्रकाशित करणार, असे यावेळी प्रकाश नारकर यांनी सांगितले.
यावेळी हेमंत माळकर, कमलेश चव्हाण, भिकाजी अर्जुन गावडे, सुभाष गावडे, दत्ताराम नांदोसकर, शेखर रेवडेकर, शैलेश बिबवणेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी नारकर म्हणाले, नांदोस गावाला शिवकालीन इतिहास आहे. इतिहासात नांदोस गावाचा उल्लेख मोठ्या प्रमाणात आढळतो. अशा या शिवकालीन परंपरा लाभलेल्या गावासह नांदोस गडाचा इतिहास संगणक युगात पर्यटनदृष्ट्या प्रकाशित करण्याचे काम करत आहोत. जेणेकरून पुढच्या पिढीला त्याची माहिती मिळू शकेल, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला असून ई बूकच्या माध्यमातून गावातील माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. गावातील जाणकारांची मदत घेऊन आपणा सर्वांच्या सहकार्याने याची सुरुवात करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
