*💫कणकवली दि.०१-:* येथील डॉ. नागवेकर हॉस्पिटलमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्या उपस्थितीत खाजगी रुग्णालयांमध्ये सुरु करावयाच्या कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात खासगी दवाखान्यांमध्ये २५० रुपयांमध्ये ही लस देण्यात येणार आहे. ६० वर्षावरील जेष्ठ नागरिक तसेच ४५ ते ५९ वयोगटातील विविध प्रकारच्या आजारांचा त्रास असलेल्यांना ही लस देण्यात येणार असल्याचे डॉ. महेश खलीपे यांनी सांगितले. येथील डॉक्टर नागवेकर हॉस्पिटलमध्ये डॉ. अनंत नागवेकर यांच्या हस्ते या लसीकरणाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला असला तरीही प्रत्यक्षात लसीकरण गुरुवारपर्यंत सुरू होईल असे डॉ. खलीपे यांनी सांगितले. यावेळी डॉ. कीर्ती नागवेकर, डॉ. मयूर नागवेकर, डॉ. मीनल नागवेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, डॉ. प्रशांत मडव ,आरोग्य विस्तार अधिकारी आर.डी. जोशी, प्रशांत बुचडे व इतर उपस्थित होते. जिल्ह्यातील खाजगी हॉस्पिटल मधील कोरोना लसीकरणाचा हा शुभारंभ करण्यात आला असून यासाठी आवश्यक यंत्रणा या हॉस्पिटलमध्ये सज्ज करण्यात आली आहे. यात वेटिंग रूम पासून लसीकरण रूम तसेच विश्रांती रूम आधी अत्यावश्यक सेवा उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत.६० वर्षावरील नागरिक तसेच ४५ ते ५९ वयोगटातील लोकांना ज्यांना किडनी, फुफुस, हृदयरोग, यकृत रोग अशा स्वरूपाच्या समावेश करण्यात आलेल्या 20 आजारांचा त्रास असल्याबाबत नोंदणीकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रावर लस देण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी kovid 20 व आरोग्य सेतू याठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून तसेच अत्यावश्यक वेळी आधार कार्डच्या माध्यमातूनही नोंद करून लस देण्यात येणार आहे. यासाठी रुग्णालयात एक नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात आले असून या संपूर्ण लसीकरणाची जबाबदारी त्यांच्यामार्फत पूर्ण करण्यात येणार आहे. सिंधुदुर्गमध्ये सुमारे २५ हजार डोस प्राप्त झाले होते. आतापर्यंत १५ हजार डोस देण्यात आले असून शिल्लक डोस देण्याची कार्यवाही सुरू आहे. खाजगी दवाखान्यांना आरोग्य विभागाकडून डोस पुरविण्यात येणार असून दिवसाला साधारण शंभर डोस देणे अपेक्षित आहे. सदर डोस खाजगी दवाखान्यात आरोग्य विभागाकडून पोहोच करण्यात येणार आहेत. ज्यांना ऑनलाईन डोसा साठीची नोंदणी शक्य नाही ते या हॉस्पिटल मधील 8645095555 या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करू शकतात असे डॉक्टर खलीपे यांनी सांगितले. नागरिकांनी गर्दी न करता शक्यतो आगाऊ नोंदणी करूनच लस घ्यावी. तसेच एकदा लस घेतल्यानंतर 28 दिवसांनी बूस्टर डोस घेणेही आवश्यक आहे. असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयातील कोरोना लसीकरणाचा शुभारंभ…
