उद्धव ठाकरे यांनी मला वाढदिवसाला पाठविले हीच संदेश पारकर यांची खरी ताकद भास्कर जाधव

भास्कर जाधव:संदेश पारकर यांच्यासाठी कुणीतरी त्‍याग केला असता तर निर्णय घेणे सोपे झाले असते

⚡कणकवली ता.१४-: संदेश पारकर यांना केवळ स्थानिक पातळीवरच लढायचे नाही तर महाराष्ट्रात बदल घडविण्यासाठीही काम करायचे आहे. निश्चितपणे पुढील काळात पक्षनेतृत्व तुम्हाला न्याय देईल. पक्षसंघटना वाढीबरोबरच जनतेच्या प्रश्नांसाठी असेच धैर्य आणि हिंमतीने काम करत रहा, आम्ही तुमच्या सोबत सदैव आहोत अशी ग्वाही शिवसेना नेते आ. भास्कर जाधव यांनी संदेश पारकर यांच्या वाढदिवस सोहळ्यात दिली.कणकवली व सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याकरिता पक्षाने निरीक्षक म्हणून मला 15 जुलैला जिल्ह्यात जायला सांगितलं. मात्र मला पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून फोन आला की तुम्ही 15 तारखेला न जाता आदल्या दिवशीच कणकवली जा. कारण आपल्या लढवय्या कार्यकर्त्याचा वाढदिवस आहे. ही संदेश पारकर यांची खरी ताकद आहे. असे प्रतिपादन ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केले.

कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांचा वाढदिवस सोहळा विविध सेवाभावी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सकाळच्या सत्रात एचपीसीएल सभागृहात स्व. सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर येथील भगवती मंगल कार्यालयात वाढदिवसाचा मुख्य कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आ. भास्कर जाधव यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, अतुल रावराणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, महिला आघाडी प्रमुख निलम पालव, सौ. समृद्धी पारकर, अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, लक्ष्मी पडते, उद्योजक सुनील नारकर, दादा कुडतरकर,अभय शिरसाट ,हरी खोबरेकर, कन्हैया पारकर, शैलेश भोगले ॲड. हर्षद गावडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा, आशा सेविकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच महिला बचतगटातील महिलांना छत्री वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना आम.भास्कर जाधव म्हणाले,ज्यांनी लोकशाही संपविण्याचा घाट घातला आहे, ज्यांनी स्वायत्त संस्था आणि न्यायपालिका स्वतःच्या वळचणीला बांधल्या आहेत, जे देशाच्या संविधानाला विरोध करत आहेत अशांविरूध्द आमची लढाई आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये स्थापन केलेला शिवसेना पक्ष भाजपने गद्दारांना हाताशी धरून फोडला. पक्ष आणि निशाणी चोरून नेली, पण शिवसेनेचा विचार ते चोरू शकणार नाहीत. वाजपेयी, अडवाणींची भाजप आता राहिलेली नाही. ईडी, इन्कम टॅक्स सारखा ससेमिरा मागे लावायचा आणि दुसर्‍या पक्षातील लोकांना फोडायचे हा एककलमी कार्यक्रम भाजपने आखला आहे. मात्र येत्या निवडणूकीत जनता भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आ. जाधव यांनी व्यक्त केला.

खा.विनायक राऊत म्हणाले, सत्तेचे किंवा पक्षाचे कोणतेही पद संदेश पारकर यांच्याकडे नाही मात्र तरीही प्रत्येकाच्या हृदयात त्यांनी आपुलकीचे स्थान मिळवले आहे, हि कला इतरांकडे नाही. त्यांनी जमा केलेल्या पुण्याईचा हा साठा आहे. त्यांच्या या प्रेमापोटीच सर्व नेते मंडळी आज कार्यक्रमाला आली. एक ना एक दिवस संदेश पारकरांना मानाचे पान मिळेल. संदेश पारकरांच्या आक्रमक आंदोलनामुळेच टोलवसुली करणारे पळून गेले. संदेशच्या लोकप्रियतेचा, कर्तृत्वाचा आणि योगदानाचा त्यांना बहुमान दिला जाईल. संदेश पारकर हे बेधडक बोलतात पण ते दिलदार आहेत. पक्षनेतृत्वाने त्यांच्या कामगिरीची दखल घेतली असल्याचे खा. राऊत यांनी सांगितले.
आ. वैभव नाईक म्हणाले, विविध सेवाभावी उपक्रमांनी गेली 30 वर्षे संदेश पारकर यांचा वाढदिवस सातत्याने साजरा होत आहे, महाराष्ट्रातील हा एकमेव नेता असावा. अन्यायाविरुद्ध पेटून उठणार्‍या, जनतेच्या प्रश्नांसाठी धडपडणार्‍या संदेश पारकर यांना खा.विनायक राऊत, आ. भास्कर जाधव यांनी योग्य ती संधी द्यावी. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्रात राजकीय लढाई सक्षमपणे लढत आहेत. सिंधुदुर्गही त्यांच्या मागे असल्याचा विश्वास आ. नाईक यांनी व्यक्त केला.
गौरीशंकर खोत म्हणाले, सिंधुदुर्गात दहशतीच्या विरोधात संदेश पारकर ठामपणे लढले, त्यांच्यावर 3 वेळा सशस्त्र हल्ले झाले. पण पारकर अजिबात आपल्या ध्येयापासून ढळले नाहीत. आम्ही पूर्वी वेगळ्या पक्षात होतो तरीही त्यांच्याशी मित्रत्वाचे संबंध होते. जिल्हयातील लोकांना ते आमदार व्हावे असे वाटते. परमेश्वर नक्कीच त्यांना न्याय देईल. यावेळी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी संदेश पारकर यांना काँग्रेसचे दरवाजे उघडे असल्याचे सांगत ते पक्षात आल्यास त्यांचे स्वागत केले जाईल असे थेट आमंत्रण दिले.
यावेळी अरुण दुधवडकर, सतीश सावंत, अतुल रावराणे, अमित सामंत, सुनील नारकर आदींनी संदेश पारकर यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत त्यांचा राजकीय भविष्यकाळ उज्वल असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात केक कापून संदेश पारकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला संदेशप्रेमी, शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनतेची नाळ आपण कधीही तुटू दिली नाही:संदेश पारकर

या सोहळ्यात संदेश पारकर यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी संदेश पारकर यांनी आपल्याकडे कोणतेही पद असो वा नसो जनतेची नाळ आपण कधीही तुटू दिली नाही. अन्यायाविरुद्ध लढणं हा आपला स्थायीभाव आहे. आपल्या प्रत्येक वाढदिवसाला विविध सेवाभावी उपक्रम राबवले जातात. जनतेशी असलेली सामाजिक बांधिलकी आपण नेहमीच जपली आहे. जनतेचे प्रेम हिच आपली ताकद आणि ऊर्जा असून जनसेवेचे हाती घेतलेले व्रत अखंडपणे जोपासणार असल्याचे संदेश पारकर म्हणाले.
संदेश पारकर यांच्या वर शुभेच्छा चा वर्षाव करत असताना अनेक कार्यकर्ते हितचिंतक यांनी कणकवलीतील भगवती मंगल कार्यालय भरून गेले होते.

You cannot copy content of this page