नदीकाठच्या लोकांना तहसीलदारानी दिले सतर्कतेचे आदेश
बांदा/प्रतिनिधी
मुसळधार पावसाने तेरेखोल नदीने इशारा पातळी गाठल्याने आज सकाळी तातडीने सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी बांद्यात येत तेरेखोल नदीची पाहणी केली. हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नदीकाढच्या गावातील लोकांना तहसीलदार पाटील यांनी सतर्कतेचा इशारा दिला.
तेरेखोल नदीची इशारा पातळी हि ४.२६० मिटर इतकी असून नदीची धोका पातळी ६.२६० मिटर इतकी आहे. आज सकाळी मोजणी केली असता नदीची पाणी पातळी हि ४.७५० मिटर इतकी झाली होती. त्यामुळे तेरेखोल नदीच्या पूर प्रवण क्षेत्रात येणाऱ्या इन्सुली, बांदा, शेर्ले, सातोसे, वाफोली गावातील लोकांना सतर्क राहण्याबाबत प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या.
आंबोली तसेच धरण क्षेत्र परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नदीची पाणी पातळी वेगाने वाढत आहे. त्यामुळे लोकांनी विनाकारण नदी काठ परिसरात कपडे तसेच गुरे धुण्यासाठी जाऊ नये. प्रशासनाची सर्व यंत्रणा आपत्कालीन स्थितीत सज्ज असून लोकांनी आपत्कालीन स्थितीत तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी तहसीलदार पाटील यांनी केले.
यावेळी बांदा तलाठी फिरोज खान यांच्यासह स्थानिक व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी तहसीलदार पाटील यांनी आळवाडी येथे तेरेखोल नदीपत्राची पाहणी करत स्थानिकांना तसेच प्रशासनाला सूचना दिल्यात.
