⚡मालवण ता.११-: राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा परिषद शाळांतील रिक्त शिक्षकीय पदे भरण्यात येणार आहेत. त्यानुसार इच्छुक सेवानिवृत्त शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी केले असल्याची माहिती मालवण चे गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी दिली आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त शिक्षक पदावर नियुक्ती करण्यासाठी इच्छुक सेवानिवृत्त शिक्षकांना कमाल वयोमर्यादा ७० वर्ष असून
मानधन रु.२०,०००/- प्रतीमाह (कोणत्याही इतर लाभाव्यतिरीक्त) असणार आहे. सेवानिवृत्त शिक्षकांना जिल्हा परिषदेच्यावतीने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याशी करारनामा करावा लागेल. बंधपत्र / हमीपत्र नियुक्तीच्या कालावधीत करार पध्दतीने शिक्षकीय पदाचे विहीत काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील, या आशयाचे बंधपत्र / हमीपत्र संबंधित उमेदवारांना दयावयाचे आहे. या बंधपत्र / हमीपत्रामध्ये करार पध्दतीने नियुक्ती देताना शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा करार करुन घेण्यात येणार आहे. तसेच सदर हमी पत्रामध्ये नियुक्ती करण्यात आलेल्या व्यक्तोकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही असे नमूद असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील रिक्त असणाऱ्या शिक्षक पदाची गरज लक्षात घेवून नियुक्ती देण्यात येणार आहे. नियुक्त करण्यात आलेला शिक्षक हा नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंतच असेल.
या नियुक्त्या १५ दिवसांत करण्यात येणार असून ही संपूर्ण प्रक्रिया शिक्षण आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली पूर्ण करण्यात येणार आहे. याबाबतचे अर्ज गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती यांचेमार्फत दि. १४ जुलै रोजी पर्यंत सायं. ५ वा. पर्यंत सादर करावेत, असे आवाहन मालवणचे गटशिक्षणाधिकारी संजय माने, शिक्षण विस्तार अधिकारी उदय दीक्षित यांनी केले आहे.
