मगरीला पकडण्यात यश:नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट
⚡मालवण ता.११-: मालवम तालुक्यातील खालची देवली येथील सायाबन पुलाखालील पाण्यात आज सकाळी स्थानिक ग्रामस्थांना सुमारे साडे पाच फूट लांबीची मगर दिसून आल्याने या परिसरात घबराट पसरली. या घटनेची माहिती वनविभागास दिल्यानंतर वन विभाग, कोकण वाईल्डलाईफ रेस्क्यू फोरमचे सदस्य यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत सुमारे चार तासाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर त्या मगरीला पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले.
खालची देवली येथे सायाबन येथे अलीकडेच नव्या पुलाचे काम करण्यात आले आहे. आज सकाळी या पुलावरून जाणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांना पुलाखालील पाण्यात मगर असल्याचे दिसून आले. वस्ती लगतच्या भागात मगर आल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली. त्यांनी याची माहिती गावातील अन्य ग्रामस्थांना दिल्यानंतर त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानुसार वनपाल अनिल राठोड, वनरक्षक संजीव जाधव, वन कर्मचारी अनिल परब, राहुल मयेकर हे घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती मिळताच कोकण वाईल्डलाईफ फोरमचे अध्यक्ष अनिल गावडे, संजयकुमार कुपकर, शुभम फाटक, दर्शन वेंगुर्लेकर, धर्माजी तांडेल, वैभव खोबरेकर, वैभव आंबरुसकर यांच्यासह पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे तसेच महसूलचे कर्मचारी आपल्या पथकासह दाखल झाले होते.
खालची देवली येथे मगर आढळली असल्याची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थ, शाळकरी मुलांनी मगरीला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पाण्याच्या मध्यभागात थांबलेली मगर बराच वेळ हलत नसल्याने तिला पकडण्याचे मोठे आव्हान वन विभाग आणि रेस्क्यू टीमसमोर होते. मगर पाण्यातून बाहेर पडून दुसरीकडे जाऊ नये यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुलाच्या मुखाकडील भागास जाळे लावले. पुलावर बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने पोलीस निरीक्षकांनी कोणालाही मगरीपासून धोका पोहचू नये यासाठी त्यांना घटनास्थळावरून दूर केले. मगरीला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. अखेर चार तासांच्या प्रयत्नांनंतर रेस्क्यू टीमला या साडे पाच फूट लांबीच्या मगरीला पाण्यातून बाहेर काढण्यात यश मिळाले.
पकडण्यात आलेली मगर वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली असून तिला सुरक्षित ठिकाणी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.
