मालवणात मोकाट कुत्र्यांचा वाढता संचार ; नागरिकांमध्ये भीती

⚡मालवण ता.०३-: मोकाट कुत्र्यांचा संचार ही मालवण शहराची कायमची डोकेदुखी ठरली असून कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर कोणतेही नियंत्रण आलेले नाही. रस्त्यावर व गल्ली बोळात तसेच समुद्र किनारी फिरणारे हे कुत्रे लहान मुले, पादचारी, दुचाकीस्वार यांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार वाढत आहेत. तसेच कुत्र्यांमुळे अनेकवेळा अपघातही घडले आहेत. यामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत असताना या समस्येबाबत मालवण नगरपालिका प्रशासन सुशेगात आहे.

दरम्यान, याबाबत मनसेचे कार्यकर्ते विशाल ओटवणेकर यांनी आवाज उठवला असून मालवण शहर परिसरात मोठ्या संख्येने असणाऱ्या मोकाट कुत्र्यांवर मालवण नगरपरिषद प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.

मालवण शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मालवण नगरपालिकेने यापूर्वी काही वेळा कुत्र्यांचे निर्बीजीकरण शस्त्रक्रिया मोहीम राबवली. मात्र त्यामध्ये कोणतेही सातत्य ठेवण्यात आले नाही. भरदिवसा तसेच रात्रीच्या वेळी कुत्र्यांच्या मुक्त संचारामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन ये – जा करावी लागत आहे. कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनाही वाढत आहेत. मात्र याबाबत नगरपालिका प्रशासनाचे कोणतेही लक्ष नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत मनसेचे विशाल ओटवणेकर यांनी नगरपालिकेने कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी तात्काळ उपाययोजना राबवावी, अशी मागणी केली आहे.

You cannot copy content of this page