बाळू गावडे यांचा इशारा : पाईपलाईन खोदाईमुळे मडुऱ्यातील पूलाला धोका
⚡बांदा ता.२६-: मडुरा-शेर्ले मार्गावरील मारुती मंदिर नजीक असलेल्या पुलाच्या बाजुने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पाईपलाईन टाकण्यासाठी दुर्घटना घडण्यासारखी खोदाई केली आहे. परिणामी एका बाजूने पुलाचा भराव कोसळत असून पूल समांतर संरक्षक भिंतीची आवश्यकता आहे. पावसाळा सुरू झाला तरी ठेकेदार याकडे गांभीरतेने लक्ष देत नाही. त्यामुळे अशा ठेकेदारांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोणत्या अधिकाऱ्याचा आशीर्वाद आहे, असा सवाल करत भविष्यात पुलावर जीवित हानी झाल्यास अधिकाऱ्यांसह ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा, भाजप सावंतवाडी तालुका कार्यकारणी सदस्य तथा मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी दिला आहे.
बांदा-शिरोडा मार्गावरील मडुरा हनुमान मंदिराजवळ असलेले पूल वाहतुकीस धोकादायक बनले आहे. बांद्याच्या दिशेने उजव्या बाजूला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. ठेकेदाराने काम करताना पुलाच्या एका बाजूस धोका निर्माण केला आहे. बेशिस्त नियोजन आणि केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी मडुरा पंचक्रोशीतील नागरिकांना भविष्यातील समस्या उभी करून ठेवली आहे. पाईपलाईनच्या बाजूने संपूर्ण संरक्षक भिंत काँक्रिटीकरण करण्याची वारंवार मागणी आम्ही केली. परंतु याकडे बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी दुर्लक्ष केले. भविष्यात पूल कोसळून दुर्घटना घडल्यास जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार राहतील, असे बाळू गावडे यांनी सांगितले.
चार दिवसांची डेडलाईन!
ठेकेदाराने चार दिवसात पुलाला समांतर संरक्षक भिंत उभी न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचक्रोशीतील समस्त नागरिकांना घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेराव घालणार असल्याचा इशारा मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी दिला.
दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
