तोंडवळी प्राथमिक शाळेला दोन कायमस्वरूपी शिक्षक उपलब्ध करून देण्याची केली मागणी
⚡मालवण ता.२३-: गेली आठ वर्षे जि. प. शाळा तोंडवळी खालची येथील प्राथमिक शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळावेत याविषयी मागणी करूनही पालक आणि ग्रामस्थांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या मालवण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला आज दोन कायमस्वरूती शिक्षक तात्काळ उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करत तोंडवळी खालची येथील ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकारी यांना धडक देत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.
यावेळी उपस्थितांनी उद्या शनिवार २४ जून पासून आम्ही सर्व पालक आमच्या मुलांना शाळेत पाठवणार नाही. जोपर्यंत शाळेत शिक्षक नियुक्त केले जात नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. अशी भूमिका घेतली.
दरम्यान, गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी ग्रामस्थांना तात्पुरत्या स्वरूपात सोमवारी एक शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. परंतु जोपर्यंत दोन कायमस्वरूपी शिक्षक शाळेला उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत मुले शाळेत पाठवणार नाही. असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
यावेळी सरपंच नेहा तोंडवळकर, उपसरपंच हर्षद पाटील, जितेंद्र चोडणेकर, नरेंद्र मेस्त, स्नेहल केळुसकर, पल्लवी कोचरेकर, दिक्षा कोचरेकर, स्नेहा कांदळगावकर, भारती मालोंडकर, जान्हवी पराडकर, प्रिया तोरसकर, शमिका धुरी, मनस्वी चोडणेकर, सलोनी खवणेकर, पंकज शेलटकर, लाडोबा आडकर, गणपत शेलटकर, पुंडलिक मालंडकर, आनंद कोचरेकर, विजय खवणेकर, नंदकुमार कोचरेकर, स्नेहल केळुसकर, सुरेंद्र मालंडकर, आनंद खडपकर आदि उपस्थित होते.
तोंडवळी खालची येथील ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकारी संजय माने यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जि. प. शाळा तोंडवळी येथे खालची येथे सध्या दोनच शिक्षक कार्यरत आहेत. सन २०२२-२३ मध्ये शिक्षक मिळवण्यासाठी शाळा बंद आंदोलन करावे लागले होते. आठ वर्षे या शाळेला शिक्षक मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. परंतु आजपर्यंत कायमस्वरूपी शिक्षक मिळाला नाही. या शाळेला चार शिक्षक मंजूर आहेत. त्यात एक रिक्त तर एक शिक्षक शाळा हडी जुवा पाणखोल येथे कामगिरी साठी पाठवण्यात आले. दोन पिकी एक शिक्षक कार्यालयीन कामे सांगून बाहेर असतात. त्यामुळे एक शिक्षक आणि सात वर्ग तरब २७ विद्यार्थी अशी स्थिती असून मुलांच्या शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे. तरी शाळेला तात्काळ कायमस्वरूपी आणखी दोन शिक्षक उपलब्ध करून द्यावेत. तसेच लवकरच सर्व रिक्त पदे भरणा व्हावीत. अशी मागणी करण्यात आली आहे.
विद्यार्थी वर्गाकडे मोठी गुणवत्ता असलेल्या या शाळेकडे शिक्षण विभागाचे नेहमीच दुर्लक्ष झाले. काही वेळा शिक्षक शाळेत आराम करायचे. मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आता आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागली. जोपर्यंत शिक्षक नाही तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार असे पालकांनी सांगितले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी संजय माने म्हणाले, शासनाकडून नवीन शिक्षक भरतीबाबतचा अध्यादेश आला आहे.
त्यानुसार नवीन शिक्षक भरती होणार आहे. त्यामुळे शिक्षक उपलब्ध होतील. तुमच्या शाळेतही ४ मंजूर पदानुसार शिक्षक देण्याचा प्रयत्न राहील. सध्या आमचाही नाईलाज आहे. तरीही तात्पुरत्या स्वरूपात सोमवारी शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल. यावर तोंडवळी खालची येथील ग्रामस्थांनी आम्हाला कायमस्वरूपी दोन शिक्षक त्वरित उपलब्ध करून देण्यात यावेत. शिक्षण विभागाच्या कारभारावर आमचा विश्वास नाही अशा शब्दात भूमिका मांडली. यानंतर गटविकास अधिकारी आप्पासाहेब माने यांच्याशी ग्रामस्थांनी चर्चा केली. परंतु शिक्षक उपलब्ध होण्यासाबाबत सकारात्मक उत्तरे न मिळाल्याने ग्रामस्थांनी मुले शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला.
