⚡वेंगुर्ला ता.०५-: बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला येथे आयोजित नॅशनल कॉन्फरन्स ऑन “Ecological Services for Sustainable and Healthy Future” या परिषदेचा उत्साहात समारोप झाला.परिषदेच्या अंतिम दिवशी विविध पर्यावरणपूरक उपक्रम, प्रात्यक्षिके व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी मांडवी खाडी येथे कांदळवन सफरीचे आयोजन करण्यात आले. या सफरीत श्रीमती हुले यांच्या स्वामिनी सेल्फ हेल्प ग्रुपच्या सदस्यांनी होडीतून कांदळवनांची माहिती दिली. काही सहभागी सदस्यांनी कायाकिंगचा अनुभव घेत खाडीतील जैवविविधतेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. सफरीनंतर कांदळवन संवर्धनावर सविस्तर चर्चा झाली.
यानंतर कांदळवन नर्सरी विषयावर डॉ. तरन्नूम मुल्ला यांनी मार्गदर्शन केले. पदमा पाटील यांनी फ्रुट कार्विंगचे प्रात्यक्षिक सादर केले. तर दीपाली तायवाडे पाटील यांनी फ्लोरल ड्रिंक्स तयार करण्याबाबत माहिती दिली. प्रा. डॉ. धनश्री पाटील यांनी बोन्साय कलेचे प्रात्यक्षिक दाखवले. सायंकाळी बॅरिस्टर नाथ पै समुदाय केंद्र सभागृहात समारोप व व्हॅलिडेक्टरी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप अध्यक्षस्थानी होते. यावेळी ज्ञानकुंज कॉलेज ओरोसचे प्रा. प्रितेश लाड, माझा वेंगुर्ला प्रतिनिधी यासीर मकानदार, डॉ. तरन्नूम मुल्ला, बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा. माने व प्रा. डॉ. धनश्री पाटील उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनासाठी गेल्या पाच वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना “Eco Soldier” म्हणून सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रितेश लाड, हिरोजी परब, प्रीती वडकर, जुवेरिया मुराद, पार्थ कोलंबकर, गौरव पालव, गोपाळ कोरगावकर व पल्लवी भोगटे यांचा समावेश होता.
तसेच काचेच्या टाकाऊ बॉटल्सवर चित्रकला करून पुनर्वापराला चालना देणारे यामेश खवणेकर व सुरंगीपासून अत्तर निर्मिती करणारे महेश पालव यांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रिती वाडकर यांनी मार्गदर्शन केलेले सुरंगीपासून तयार करण्यात आलेल्या “शिवसा 2” या अत्तराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उत्कृष्ट पर्यावरणविषयक पोस्टर्सचेही बक्षीस वितरण करण्यात आले. नारळाच्या काथ्यांपासून तयार वस्तूंचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते.याचवेळी येत्या 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त आयोजित“शिवराजभूषण” या नाट्यप्रयोगाची घोषणा अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आली.अशा प्रकारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ही राष्ट्रीय परिषद यशस्वीपणे संपन्न झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बॅ.खर्डेकर महाविद्यालय, गार्डन्स क्लब कोल्हापूर, ज्ञानकुंज कॉलेज ओरोस, वेंगुर्ला नगरपरिषद, इंडियन वुमन सायंटिस्ट्स असोसिएशन, माझा वेंगुर्ला टीम व सर्व सहभागी सदस्यांचे आभार मानण्यात आले.
वेंगुर्ला येथे कांदळवन संवर्धन, पर्यावरण रक्षण आणि इको सोल्जर्सचा सन्मान…
