श्रीकृष्ण तळवडेकर यांच्या प्रयत्नांना यश
⚡मालवण ता.२३-: पाच वर्षांपूर्वी मालवणात चांगल्या प्रकारे चाललेले कामगार कल्याण मंडळाचे केंद्र कोणतेही संयुक्तिक कारण न देता मालवण तालुक्यातील अतिदुर्गम अशा आडवली गावात स्थलांतरीत करण्यात आल्यानंतर शासनाच्या या आडमुठे धोरणाला तीव्र विरोध दर्शवून आडवली येथे नेलेले हे केंद्र पुन्हा मालवणात येण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त आणि सिंधुदुर्ग सेवादल कॉंग्रेसचे मालवण अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांच्या प्रयत्नाना यश आले आहे शासन स्तरावरून तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून हे मालवण केंद्र पुन्हा मालवण वायरी येथील गाड कंपाऊंड मध्ये १ जून पासून सुरु झाले आहे.
मालवण येथील कामगार कल्याण मंडळाचे केंद्र हे मे २०१८ मध्ये अतीदुर्गम भाग असलेल्या आडवली गावात स्थलांतरीत करण्यात आले होते. त्यामुळे हे केंद्र पुन्हा मालवणात होण्यासाठी सन २०१८ पासून मालवण येथील कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त आणि सिंधुदुर्ग सेवादल कॉंग्रेसचे अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतर शासन स्तरावरून तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून हे केंद्र पुन्हा मालवण येथे चालू करण्यात आले आहे. मालवण वायरी येथील गाड कंपाऊंड मध्ये १ जून पासून कामगार कल्याण मंडळाचे केंद्र सुरु झाले आहे.
महाराष्ट्र शासनाने सन १९५३ मध्ये कायदा करुन कामगारांच्या कल्याणासाठी कामगार कल्याण केंद्र चालू केली. त्यापैकी कामगार, मालक आणि शासन याची वर्गणी घेतली जाते. कामगार कल्याण केंद्र यामध्ये कामगार, कामगाराच्या कुटुंबातील सदस्य या सर्वांना त्याचा फायदा होणार आहे. शिशुमंदीर, शिवण वर्ग, हस्तकला वर्ग, फॅशन डिझायनिंग, सौंदर्य शास्त्र प्रशिक्षण, वाचनालय, अभ्यासिका, टेबल टेनिस प्रशिक्षण, बॅड मिटन प्रशिक्षण, शासन मान्य ग्रंथपाल प्रमाणपत्र वर्ग, संगणक प्रशिक्षण, व्यायामशाळा, मोफत कायदे विषयक सल्ला, योगा वर्ग, कराटे वर्ग, शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक खर्च, वैद्यकीय मदत असे अनेक उपक्रम राबवले जातात.
कामगार कल्याण मंडळाचे केंद्र पुन्हा मालवणात सुरु झाल्याने निमशासकीय सर्व कामगाराना त्याचा मोठा फायदा होणार आहे. या मध्ये एस. टी. महामंडळ, विद्युत महामंडळ, साखर कारखाने, खाजगी सहकारी बँका, काजू फॅक्टरी, मालवणी बझार, खरेदी विक्री संघ, अमिशन फॅक्टरी, हॉटेल व्यवसायातील व अन्य खाजगी क्षेत्रातील कामगाराना त्यापासून सवलती मिळणार आहेत. या सर्व उपक्रमांचा कामगारानी मालवण येथील कामगार कल्याण मंडळाचे सभासद होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीकृष्ण तळवडेकर यांनी केले आहे.
