८० वर्षीय माजी विद्यार्थिनी सीमा सावंत साटम यांनी केली मदत
मालवण दि प्रतिनिधी
लहानपणी शाळेत पाटीवर गिरविलेल्या अक्षरांमुळेच आपले जीवन समृद्ध झाल्याची भावना आपल्या शाळेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माजी विध्यार्थ्यांची असते आणि याच भावनेपोटी तो कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या शाळेचे ऋण तो फेडत असतो शाळेविषयी असलेल्या प्रेमापोटी मसुरे येथील प्राथमिक शाळेच्या माजी विध्यार्थीनी असलेल्या ऐंशी वर्षीय सीमा सावंत -साटम यांनी मसुरे येथील प्राथमिक शाळेला एक लाख रुपयांची मदत देऊन आपल्याला शाळेकडून मिळालेल्या ज्ञानदानातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे
मसुरे येथील प्राथमिक शाळा नंबर एक च्या माजी विदयार्थीनी श्रीमती सीमा सावंत -साटम यांनी आपला भाचा धनंजय सावंत यांच्या माध्यमातून मसुरे नं. १ शाळेला एक लाख रुपयांची शैक्षणिक मदत दिली. सुषमा सावन्त या भारतीय आर्मीचे लेप्टनंट जनरल कुलभूषण गवस यांच्या सासू आहेत. सुमारे १६० वर्षे पूर्ण होत आलेल्या मसुरे नं. १ शाळेत सुरु असलेले विविध उपक्रम, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मिळालेले अपूर्व यश, शिक्षकांची मेहनत व योगदानाची माहिती धनंजय सावंत यांचे मार्फत श्रीमती सीमा सावन्त यांच्या कानावर गेली. आणि ८० वर्षाच्या या माजी विद्यार्थिनीने शाळेला शैक्षणिक मदत केली.
धनंजय सावंत यांच्यामार्फत मसुरे नं. १ शाळेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका शर्वरी शिवराज सावंत, नुतन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शितल शैलेश मसुरकर, उपाध्यक्ष संतोष दुखंडे, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्मेष मसुरेकर यांचेजवळ सुपूर्द केली. यावेळी शिक्षणप्रेमी सदस्य लक्ष्मी दत्तप्रसाद पेडणेकर, विनोद सातार्डेकर, गोपाळ गावडे, रामेश्वरी मगर व विद्यार्थी उपस्थित होते.
