आचरा गावातील कचरा समस्या सोडविण्यासाठी यशराज प्रेरणा ग्रुपचा पुढाकार

⚡मालवण ता.२३-: ऐतिहासिक आणि सांस्कृतिकतेचा वारसा जोपासणारा आचरा गाव सध्या कचऱ्याच्या विळख्यात सापडला आहे. नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. ग्रामपंचायतीने कचराकुंड्यांची व्यवस्था केली नसल्याने उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे.
या पार्श्वभूमीवर आचरा गावातील यशराज प्रेरणा ग्रुप या सेवाभावी संस्थेने पुढाकार घेत ‘स्वच्छ आचरा, सुंदर आचरा’ हा उपक्रम हाती घेऊन पहिल्या टप्प्यात ग्रामस्थ, व्यापारी तसेच सार्वजनिक ठिकाणी जाऊन जनजागृती करून कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आवाहन करत आहेत.

आचरा गावात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे. यशराज प्रेरणाचे सदस्य ‘सेवा तिथे युवा’ हे ब्रीदवाक्य घेऊन सामाजिक व लोकहिताचे उपक्रम राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी ‘स्वच्छ आचरा, सुंदर आचरा’ या उपक्रमावर भर देत ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. बाजारपेठ गटारसफाई, प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावणे, तसेच वाटेल तिथे उघड्यावर कचरा टाकणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. यावर ग्रामसेवकांनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याचे अध्यक्ष मंदार सरजोशी, उपाध्यक्ष गणेश आचरेकर, कार्यवाह प्रियांका हिंदळेकर, सदस्य संगीता चिंबे, जाहिरातप्रमुख मंजिरी घाडी यांनी सांगितले.

ग्रामस्थांनी घरच्याघरी सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी. तसेच ओला कचरा उघड्यावर न टाकता कचराकुंडीत टाकावा. ग्रामपंचायत प्रशासनानेही सार्वजनिक कचराकुंड्यामधील कचरा वेळेच्या वेळी उचलायला पाहिजे. तसेच ज्या ग्रामस्थांच्या मूर्खपणामुळे नवनवीन उदयास आलेल्या डंपिंग ग्राऊंडवर सूचना फलक लावले गेले पाहिजेत, अशा मागण्या करण्यात येत आहेत. उघड्यावर टाकलेल्या कचऱ्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी यशराज प्रेरणा ग्रुपने पुढाकार घेतला आहे. पहिल्या टप्प्यात प्रतिष्ठित ग्रामस्थ, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, आठवडा बाजारातील व्यापारी तसेच इमारतींमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांना कचऱ्याबाबत जनजागृती केली. प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी होऊन कचरामुक्त आचरा गाव करण्यासाठी हातभार लावला पाहिजे. सामाजिक संस्था तसेच दानशूर व्यक्तींनी कचराकुंडी उपलब्ध करून दिल्यास कचऱ्याची विल्हेवाट योग्यरीतीने लावता येईल, असे मंदार सरजोशी म्हणाले.

You cannot copy content of this page