ही योजना स्वतंत्र राबवा:प्राथमिक शिक्षक संघाची मागणी
सिंधुदुर्गनगरी ता १२ सिंधुदुर्ग जिल्हा शालेय पोषण आहार स्वयंपाकी संघाकडून प्रधानमंत्री
पोषण शक्ती निर्माण योजनेच्या संदर्भात शिक्षकांवर चुकीचे आरोप करून बदनाम केले जात आहे.
याबाबत शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे. तरी ही योजना स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबविण्यात यावी. अशी मागणी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतंर्गत इंधन भाजीपाला
अनुदानाचे बाबत शिक्षणाधिकारी यांचे कडील दि.१५ मे २०२३ च्या
पत्राच्या संदर्भाने सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी शाळांना कळविलेले आहे.
गेली अनेक वर्षे ही योजना शाळा व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमांतून
शाळा यशस्वीपणे राबवित आहेत. बचतगट किंवा स्वयंपाकी यांना
संपूर्णपणे शाळा व्यवस्थापन समिती, सभेत माहिती देवून समन्वयातून
योजना चालविली जात आहे. त्यासाठी शिक्षकाचे योगदान मोठया प्रमाणात
आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये कमी पटसंख्येच्या शाळांमध्येही
चांगल्या प्रकारे काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मात्र दि. १० जून २०२३ च्या वृत्तपत्रामध्ये शालेय पापेण आहार
स्वयंपाकी संघ पणदूर कडून मुख्याध्यापक, शिक्षकांवर चुकीचे आरोप
करण्यात आले आहेत. त्याबाबत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ
सिंधुदुर्गचे वतीने तीव्र नाराजी व्यक्त करीत आहोत. ही शिक्षकांच्या
अस्मितेला धक्का पोहचविणारी गोष्ट असून सर्व शिक्षकाच्या मनात या
योजनेबाबत नाराजी निर्माण झालेली आहे.
शासनाच्या नियमानुसार ही योजना चालवत असताना मुख्याध्यापक
तसेच शिक्षकांना अनेक वेळा मानसिक मनस्ताप सहन करावा लागतो.
ग्रामिण भागात अनेक अडचणीना तोंड दयावे लागते. अनेक वर्षे ही योजना
स्वतंत्र यंत्रणेकडे देण्यासाठी शिक्षक संघटनांचा आग्रह आहे. शाळेच्या शैक्षणिक
व्यवस्थापनावर सुद्धा काही वेळा याचा अनिष्ट परिणाम होतो. त्यासंबंधीची
ऑनलाईन कामे करण्यासाठी अनेक वेळा गैरसोयींना तोंड द्यावे लागते.असे असताना स्वयंपाकी संघाकडून नाहक चुकीचे आरोप करून शिक्षकांना बदनाम केले जात आहे. याबाबत आज मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजा कविटकर, सरचिटणीस बाबाजी झेंडे, म.ल. देसाई, एकनाथ बच्चे, विनया सातार्डेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
