तात्या माधव : मडुरा पंचक्रोशीतील ग्राहक छेडणार आंदोलन
⚡बांदा ता.११-: ग्रामीण भागातील वीज पुरवठा वीज ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता दुरुस्तीच्या नावाखाली अवेळी खंडित केला जातो. मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाली अन मडुरा पंचक्रोशीत वीज वितरणचा लपंडाव सुरू झाला. मान्सूनपूर्व कामे न केल्याने तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कामाकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाल्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जर सलग चार तास वीज पुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या कार्यालयात येऊन घेराव वजा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा मडुरा येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंत उर्फ तात्या माधव यांनी दिला आहे.
ग्रामीण भागात पाऊस आणि विजेचा लपंडाव हे समीकरण नवीन नाही. बेजबाबदार अधिकाऱ्यांना वरिष्ठ पदावर बसवून ठेवले अन ग्रामीण भागातील सामान्य विज ग्राहकांना अंधारात ठेवले अशी परिस्थिती सद्यस्थितीत मडुरा पंचक्रोशीत सुरू आहे. अवाच्या सव्वा बीज वीज बिल आकारणी करून वीज वितरणचा कारभार सुरू असतो. परंतु हजारो, लाखो रुपये मानधन घेणाऱ्या अधिकाऱ्यांचे वीज ग्राहकांच्या समस्यांकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष होते. मान्सूनपूर्वक कामे अद्यापही झालेली नसून याला जबाबदार कोण असा सवाल तात्या माधव यांनी केला.
दरम्यान, मडुरा पंचक्रोशीतील गावात चार तासांच्यावर वीज पुरवठा खंडित झाल्यास ग्रामस्थ व वीज ग्राहकांना घेऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव वजा आंदोलन छेडण्यात येईल. तसेच कायदा सुव्यवस्था बिघडल्यास याला सर्वस्वी जबाबदार अधिकारीच राहतील असा इशाराही तात्या माधव यांनी दिला आहे.
फोटो——
तात्या माधव
