⚡मालवण ता.११-: मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी व वाचन संस्कृतीपासून दूर चाललेल्या उदयोन्मुख पिढीस वाचते करण्यासाठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी, भविष्यातील वाचक तयार करणे, वाचक घडविणे यासाठी नगर वाचन मंदिर, मालवण तर्फे आयोजित ‘बाल कुमार ज्ञान कोपरा’ या उपक्रमांतर्गत ग्रंथालयाच्या सभागृहामध्ये बाल वाचकांना एकत्र आणण्यासाठी कथाकथन सादरीकरण (इ. १ली ते ३री ), कथालेखन स्पर्धा (इ. ४थी ते ६ वी) व चित्रकला स्पर्धा (इ.७वी ते ९वी) घेण्यात आल्या. या स्पर्धाना बाल वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित पालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन श्री सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल संजय शिंदे यांनी केले. या स्पर्धांमध्ये कथा सादरीकरण – आरोही प्रदिप देऊलकर व माही अजय रेडकर, कथालेखन प्रथम क्रमांक – भार्गवी प्रदीप देऊलकर, व्दितीय क्रमांक- आर्या अश्विन दिये व चित्रकला स्पर्धा प्रथम क्रमांक – वेदांत शिवप्रसाद नाईक, व्दितीय क्रमांक – लौकीक श्रीगणेश मालवणकर यांनी पटकावला.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पालकांनी सुध्दा बालकथांचे वाचन करून कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक ग्रंथपाल श्रेया चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिभा पेडणेकर व रमाकांत जाधव यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाला बहुसंख्य वाचक उपस्थित होते.
