प्रमोद हडकर यांच्या प्रमाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक
*💫मालवण दि.२५-:* वायरी भूतनाथ येथे एका पर्यटन व्यावसायिकाची रस्त्यात सापडलेली तब्बल दीड लाखाची रक्कम येथील प्रमोद सावळाराम हडकर यांनी प्रामाणिकपणे त्या व्यावसायिकाला परत केल्याची घटना बुधवारी घडली. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची असलेल्या हडकर यांनी दाखवलेल्या या लाखमोलाच्या प्रमाणिकपणा बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. वायरी येथील एक पर्यटन व्यावसायिक बुधवारी दीड लाखाची रोख रक्कम बँकेत भरणा करण्यासाठी जात होता. यावेळी बँकेत गेल्यावर मोटरसायकलला अडकवलेली रक्कम असलेली पिशवी वायरी – मालवण रस्त्यात पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. मित्रांच्या मदतीने शोधाशोध करूनही सदरील रक्कम असलेली पिशवी सापडून आली नाही. याचवेळी वायरी भूतनाथ येथील प्रमोद हडकर हे मालवण हून घरी जात होते. त्यांना ही रक्कम असलेली पिशवी रस्त्यात पडलेली सापडून आली. हडकर यांनी चौकशी केली असता वायरी येथील एका पर्यटन व्यावसायिकाची काही रस्त्यात रक्कम पडल्याचे सांगण्यात आले. यावेळी हडकर यांनी तात्काळ सदरील पर्यटन व्यावसायिकाशी संपर्क साधत दीड लाखाची रक्कम त्याच्याकडे सुपूर्द केली. प्रमोद हडकर यांची घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. याही परिस्थितीत त्यांनी रस्त्यात सापडलेली मोठी रक्कम कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे परत केली या बद्द्ल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान, आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या प्रमोद हडकर यांचे डोळ्यांचे ऑपरेशन करायचे आहे. मात्र आर्थिक क्षमता नसल्याने त्यांना ऑपरेशन करून घेण्यात अनेक अडचणी येत आहेत. असे असतानाही त्यांनी सापडलेली रक्कम परत केली. त्यांचा हा प्रामाणिकपणा पाहून काळेथर तारकर्ली येथील व सध्या मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते संतोष आचरेकर यांनी हडकर यांच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आर्थिक मदत करण्याची तयारी दर्शवली आहे, यासाठी ते हडकर यांची भेटही घेणार आहेत, अशी माहिती भाई मांजरेकर यांनी दिली आहे.