मालवण रोझरी इंग्लिश स्कूल रौप्य महोत्सव सांगता सोहळा 27 रोजी…

*प्रशालेच्या नव्या इमारतीचे होणार उदघाटन : व्यवस्थापक फादर रिचर्ड सालढाणा यांची माहिती

*💫मालवण दि.२५-:* मालवण येथील रोझरी इंग्लिश स्कूलच्या २५ व्या रौप्य महोत्सवाचा सांगता सोहळा येत्या २७ फेब्रुवारीला रोझरी इंग्लिश स्कूल येथे सायंकाळी ४.३० ते ८ यावेळेत पार पडणार आहे. याचबरोबर प्रशालेच्या नव्या इमारतीचा उदघाटन सोहळाही मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून हा सोहळा पार पाडला जाणार असल्याची माहिती प्रशालेचे व्यवस्थापक फादर रिचर्ड सालढाणा यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. रोझरी इंग्लिश स्कूल येथे सायंकाळी पत्रकार परिषद झाली. यावेळी फादर के. मरियादास उपस्थित होते. फादर सालढाणा म्हणाले, २५ वर्षापूर्वी म्हणजेच १९९५ साली फादर घाब्रियल डिसिल्वा यांच्या संकल्पनेतून रोझरी इंग्लिश स्कूलची निर्मिती झाली. या स्कूलला फेब्रुवारी २०२० मध्ये २५ वर्षे पूर्ण झाली. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गेल्या वर्षभरात ऑनलाईन पद्धतीने विविध उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले. गेली सोळा वर्षे प्रशालेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागत आहे याचा आपल्याला अभिमान आहे. या रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा येत्या २७ फेब्रुवारीला होत आहे. या सोहळ्यास सिंधुदुर्ग प्रांतांचे धर्मगुरू ऑल्विन बरेटो, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सोहळ्यात पालक, विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. त्याचबरोबर इमारतीच्या बांधकामासाठी योगदान दिलेल्या पालक, माजी विद्यार्थी आणि दात्यांचा सत्कार केला जाणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर पालकांची कार्यक्रमास गर्दी होऊ नये यासाठी या सोहळ्याचे युट्युब व स्थानिक केबल नेटवर्कवरून थेट प्रक्षेपण दाखविले जाणार आहे, असे यावेळी फादर सालढाणा यांनी केले आहे.

You cannot copy content of this page