कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला निर्णय
*💫दोडामार्ग दि.२५ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यातील शिवभक्तांचे प्रसिद्ध श्रद्धास्थान असलेल्या व भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या तेरवण मेढे येथील पवित्र तीर्थक्षेत्र समजल्या जाणाऱ्या श्री नागनाथ मंदिरात १० व ११ मार्च या दिवशी होणाऱ्या शिवयात्रेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना दर्शनास येण्यास बंदी करण्यात आली असून तसे आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे देवस्थान समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र होणारी वार्षिक कार्ये व पूजा, अन्य शुभ धार्मिक विधी ठराविक ग्रामस्थ व मानकरी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहेत. कोव्हिडं १९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाला विनंती करणारे पत्र सदर देवस्थान समितीने काल तहसीलदार दोडामार्ग यांना दिले होते त्यावर मार्गदर्शक सूचना आल्यानंतर प्रसिद्धी पत्रकाद्वारे या महाशिव यात्रोत्सवाची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली. यावेळी या जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुकाने, हॉटेल, इतर सर्व प्रकारची दुकाने पार्किंग व्यवस्था व जाहिरात फलक लावणेसही मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे आजूबाजुतील गाव, शहर, राज्य, जिल्हा येथील सहभागी होणाऱ्या भाविकांनी जत्रेत सहभागी न होता ज्या ठिकाणी आहेत तेथूनच देवाला नमस्कार करावा असे आवाहन मौजे तेरवण मेढे मानकरी ग्रामस्थ व देवस्थान समितीने या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.