नागरिक, दीव्यांग, वृध्द नागरिकांना बसला फटका;वेंगुर्ले तहसील कार्यालय बाबत नाराजी
वेंगुर्ले ता.२४-: वेंगुर्ला तहसील कार्यालय यांच्या मार्फत मुख्यमंत्री शासकीय योजना सुलभीकरण अभियान अंतर्गत काल आयोजित करण्यात आलेल्या “शासन आपल्या दारी” महास्वराज्य अभियान शिबीर या कार्यक्रमात वेंगुर्ला तहसील कार्यलयाच्या नियोजनाच्या अभावाचा फटका नागरिक, दिव्यांग व वृद्धांना सहन करावा लागला. याठिकाणी उपस्थित नागरिकांनी या कार्यक्रमावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
वेंगुर्ले तहसिल कार्यालय व वेंगुर्ले पंचायत समितीच्या एकाित्मक बाल विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आज शासन आपल्या दारी व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावागावातून आलेल्या नागरिकांकडून तहसील कार्यालायच्या मुख्य दरवाज्याच्याच बाजूला अर्ज भरून घेतले गेल्याने एकच गर्दी झाली. दिव्यांग व वृद्धांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला.
यानंतर कार्यक्रमाच्या उदघाटन प्रारंभी अहील्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व सावित्रीबाई फूले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रांताधीकारी प्रशांत पानवेकर, वेंगुर्ले तहसिलदार ओंकार ओतारी, नायब तहसिलदार संदिप पानमंद, गटविकास अधिकारी मोहन भोई, वेंगुर्ले न. प. मुख्याधिकारी परितोष कंकाळ, पशुधन विकास अधिकारी विदयानंद देसाई, एकाित्मक बालविकास अधिकारी श्रीमती सामंत, भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, शिवसेना वेंगुर्ले तालुका प्रमुख नितिन मांजरेकर आदी उपस्थित होते.
वेंगुर्लेचे तहसीलदार ओमकार ओतारी आपले प्रास्ताविक सादर करताना म्हणाले की, शासन आपल्या दारी व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान अंतर्गत वेंगुर्ले तालुक्यासाठी विविध विभागातील १० हजार लाभार्थ्यांचे उदिष्ठ देण्यात आले होते. मात्र वेंगुर्ले तालुक्यातील सर्व कार्यालयीन प्रमुखांनी उत्कृष्ठ काम केल्याने अभियान कालावधीत एकूण १२२६६ लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. त्यातील ६५११ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला आहे. तर उर्वरित ५७५५ लाभार्थी प्रस्तावित आहेत.
चौकट: शासन आपल्या दारी अभियानात वेंगुर्ले तालुक्यात दिलेल्या उदिष्ठापेक्षा जास्त काम झाल्याने सर्व प्रशासकीय अधिकारी आणि लाभार्थी यांचे कौतुक आहे. दरम्यान लोककल्याण हे ध्येय उराशी बाळगून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सरकारी योजनांचा लाभ देता यावा या उद्देशाने आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी गतीमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी” अभियान शासनातर्फे राबविण्यात येत आहे. त्याचा सर्वांनी घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांनी केले.
चौकट: दरम्यान या कार्यक्रमात जे दाखले वितरित करण्यात आले ते दाखले दरवर्षी ग्रामपंचायत कार्यालयामार्फत वितरित करण्यात येतात मग असा कार्यक्रम आयोजित करून भर उन्हातून नागरिक, दिव्यांग, वृद्ध यांना तहसील कार्यालयात बोलवण्यात आले. व वेंगुर्ला तहसील कार्यालयाच्या नियोजनाचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागला. काही नागरिकांना तर आपल्याला याठिकाणी का बोलावले हेच माहीत नसल्याचे आढळुन आले.
फोटो: तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर झालेली गर्दी
२) याठिकाणी आलेल्या दिव्यांग व्यक्तींसाठी स्वातंत्र्य बैठक व्यवस्था नसल्याने अशा प्रकारे दिव्यांग पायऱ्यांवर बसून होते.
