⚡बांदा ता.२१-: तीव्र उन्हाळ्यामुळे पाडलोस-केणीवाडा येथे पाण्याचे स्त्रोत कोरडे पडू लागल्याने पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. जनावरांना पाणी मिळणे दुरापास्त झाले तर बागायती मान टाकू लागल्या आहेत. प्रशासनाने तात्काळ कायमस्वरूपी पाण्याची सोय उपलब्ध करावी अशी मागणी काजू-नारळ बागायतदार आनंद कुबल यांनी केली आहे.
फेब्रुवारी महिन्यालाच पाणी टंचाईची चाहूल लागण्यास सुरुवात होते. महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. पाण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी करत आहोत. तीलारी पाण्याचा कालवा गावाच्या सीमाभागात आला परंतु गावात येणे आवश्यक आहे. जर कालव्याचे पाणी संपूर्ण गावात पोहोचल्यास पाण्याचे स्त्रोत वाढून विहिरी तलावांना पाणी येईल. परिणामी ग्रामस्थांसह पाळीव जनावरांना पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल.
दुग्ध व्यवसाय करणारे युवक गावात मोठ्या संख्येने आहेत मात्र जनावरांना पाणीच नसेल तर काय करावे असा सवालही दूध उत्पादकांमधून केला जात आहे. एकंदरीत प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देत पाण्याची सोय करावी अशी मागणी बागायतदार आनंद कुबल यांनी केली आहे.
