नुकसानीस मुख्याधिकारी जबाबदार;माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचा आरोप
⚡मालवण ता.१७-: मालवण नगरपरिषदेच्या मच्छी मार्केट इमारतीवरील नवीन गाळे लिलावा विना बंद अवस्थेत पडून असून यामुळे नगरपरिषदेचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. याबाबत नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना कळवूनही त्यांच्याकडून अक्षम्य दुर्लक्ष झाला आहे असा आरोप मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे करून या नुकसानीस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून नुकसानीचे पैसे त्यांच्याकडून वसुल करावे अशी मागणी आपण शासनाकडे करणार असल्याचा इशाराही कांदळगावकर यांनी दिला आहे.
मालवण नगरपरिषदेच्या मच्छी मार्केट च्या वरील मजल्यावर भाड्याने गाळे बांधण्यात आलेले आहेत. आमच्या सत्ता कालावधीमध्ये याठिकाणी लाईट व्यवस्थे बाबत जे काम अपुरे होते ते पूर्ण करून गाळे वापरासाठी योग्य स्तिथीत करून ठेवण्यात आले होते.
आणि या गाळ्यांचा लिलावासाठी नगररचना ऑफिस कडून भाडे ठरवून घेणे बाबत प्रशासनाला वारंवार कळवूनही जवळपास दोन वर्षाचा कालावधी पूर्ण होत आला असताना अद्याप पर्यत या बाबत कुठलीही कार्यवाही करण्यात आलेले नाही, असे महेश कांदाळगावकर यांनी म्हटले असून यामुळे नगरपरिषदेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, असा दावाही केला आहे.
त्याच प्रमाणे प्राधान्याने विशेषतः मच्छिमार बांधवाना अभिप्रेत धरून , त्यांना या मच्छी मार्केटच्या ठिकाणी आपल्या व्यवसायाच्या ऑफिस, त्यांच्या मच्छिमार सोसायटीच्या ऑफिस, मासेमारीच्या अवजारांची दुकाने यासाठी व अन्य व्यावसायिकांसाठी भाड्याने गाळे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हे गाळे बांधण्यात आले होते. तो उद्देशही असफल झाला आहे. आज अनेक जणांची भाड्याने जागेची मागणी असताना अशा मोक्याच्या ठिकाणी असणारे गाळे बंद अवस्थेत आहेत, असेही कांदळगावकर यांनी म्हटले आहे.
नगरपरिषदचे मामा वरेरकर नाट्यगृह आणि ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी असलेले गाळेही लिलाव न झाल्याने बंद आहेत. मालवण सारख्या पर्यटन शहर म्हणून विकसित होत असलेल्या शहरात भाड्याने जागांची मागणी असतानाही वारंवार कळवूनही या बाबत मुख्य अधिकारी यांच्या कडून अक्षम्य दुर्लक्ष झाला आहे, असा आरोप कांदळगावकर यांनी केला आहे. गाळे बंद असल्याने नगरपरिषदेस झालेल्या नुकसानीस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून हे पैसे वसूल करावे व कारवाई करावी अशी मागणी आपण शासनाकडे करणार आहोत, असा इशारा महेश कांदळगावकर यांनी दिला आहे.
