शेर्लेत एसटीला बाजू देताना दुचाकी घसरली

रस्त्यावर विखुरलेली खडी धोकादायक : तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी

⚡बांदा ता.१७-: बांदा-शिरोडा मार्गावरील शेर्ले येथे धोकादायक स्थितीत असलेल्या रस्त्याचे काम करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला खडी टाकण्यात आली आहे. मात्र सद्यस्थितीत खडी रस्त्यावर विखुरलेल्या अवस्थेत असल्याने समोरून येणाऱ्या एसटीला बाजू देताना दुचाकी घसरली. मात्र सावधगिरी बाळगत दुचाकीस्वाराने आपला जीव वाचवला. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी एकतर सदर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण तात्काळ करावे अन्यथा खडी रस्त्यापासून दूर करावी, अशी मागणी वाहनचालक तसेच ग्रामस्थांमधून होत आहे.

शेर्लेत रस्त्यावर धोकादायक स्थितीत खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी बांधकाम विभागाने याची दखल घेत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याचा निर्णय घेऊन रस्त्याच्या बाजूला खडी टाकण्याचे काम केले आहे. आज बुधवारी सकाळी मडुरा येथील दुचाकीस्वार संदीप परब येथून जात असताना समोरून आलेल्या एसटी बसला बाजू देताना दुचाकी घसरत रस्त्याच्या बाहेर गेली. सुदैवाने अपघात टळला, परंतु रस्त्यावर आलेली खडी मात्र धोकादायक ठरत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत रस्त्यावरील खडी बाजूला तरी करावी अन्यथा रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण तात्काळ करावे अशी मागणी संदीप परब व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली.

दरम्यान, रस्त्याचे काम तात्काळ सुरू न केल्यास लोकशाही मार्गाने पुढचे पाऊल टाकण्यात येईल आणि याला सर्वस्वी जबाबदार संबंधित विभाग राहील असा इशारा मडुरा माजी उपसरपंच विजय वालावलकर यांनी दिला.

You cannot copy content of this page