जीवनाच्या आलेखात डांगमोडे गावच्या प्राथमिक विद्यामंदिराचे स्थान मोठे

जिल्हापरिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांचे प्रतिपादन

⚡मालवण ता.१४-: जिल्हा परिषद शाळा ही कायम स्मरणात राहते. याच शाळांमधून अनेकजण विविध क्षेत्रात पुढे आले असल्याने जि. प. शाळांना अनन्यसाधारण महत्व आहे. डांगमोडे येथील प्राथमिक विद्यामंदिर ही शाळा शतकोत्सव साजरा करत आहे ही आपल्या सर्वांसाठी भाग्याची गोष्ट आहे.मसुरे डांगमोडे गावच्या प्राथमिक विद्यामंदिर या शाळेतूनच आपण ज्ञानार्जन केले असल्याने आपल्या जीवनाच्या चढत्या आलेखात या शाळेचे स्थान मोठे आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी केले.

मसुरे डांगमोडे येथील प्राथमिक
विद्यामंदिरचा शतवार्षिकोत्सव आज सायंकाळी जिल्हापरिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र पराडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, माजी उपसभापती छोटू ठाकूर, अध्यक्ष राजेंद्र विठ्ठल ठाकूर, सेक्रेटरी नारायण ठाकूर, सल्लागार बाळप्रकाश ठाकूर, मर्डे ग्रामपंचायतिचे उपसरपंच राजेश गावकर, सतीश ठाकूर, सचिन ठाकूर, शिवाजी ठाकूर, बाळा आंगणे, पांडुरंग ठाकूर आदी व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र ठाकूर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. तर प्रशालेच्या विध्यार्थीनी इशस्तवन सादर केले

यावेळी राजेंद्र पराडकर पुढे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळेत आपण अत्यंत लहान वयापासून शिक्षण घेतलेले असते. हे शिक्षणही मनाला भावणारे असते. त्यामुळे शाळेतील आठवणी कायम स्मरणात राहतात. आयुष्यात चांगले काम करण्याची संधी देखील शाळाच देते. आज मराठी जिल्हा परिषद मराठी शाळाची पटसंख्या जरी कमी होत असली तरी पटसंख्या वाढविण्यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचाली होत आहेत. यास आपणा सर्वांची साथ आवश्यक आहे. डांगमोडे येथील प्राथमिक विद्यामंदिरसाठी सर्व ग्रामस्थ चांगले काम करत आहेत, असेही राजेंद्र पराडकर म्हणाले.

यावेळी बोलताना माजी जि प अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर म्हणाले, मसुरे गावाला मोठा इतिहास व देवदेवतांच्या परंपरा लाभलेल्या आहेत. मसुरेमध्ये सर्वसामावेशक अशा शिक्षण संस्था असून त्यातीलच डांगमोडे येथील प्राथमिक विद्यामंदिर ही शाळा आहे. ही शाळा आज शतकोत्सव साजरा करत आहे. शाळेशी नाते हे वेगळे असते. मराठी शाळांमधून संस्काराचे शिक्षण मिळते व त्यातून संस्कारक्षम मुले घडतात. म्हणूनच डांगमोडे शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. आज इंग्रजी महत्वाचे बनले असले तरी मराठी मधून शिक्षण घेतलेल्यांचे कुठेही काही अडले नाही. मात्र मराठी शाळांमधील मुलांची कमी पटसंख्या हा गंभीर विषय बनला असून शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी पटसंख्या वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असेही ते म्हणाले

यावेळी कार्याध्यक्ष अभिमन्यू चव्हाण, सुरेंद्र ठाकूर, अविनाश ठाकूर, अजय ठाकूर, प्रसाद ठाकूर, महेश ठाकूर, मंगेश ठाकूर, मोहनदास ठाकूर, रमेश ठाकूर, प्रदीप कानोजी ठाकूर, लक्ष्मण ठाकूर, सौ. गायत्री ठाकूर, श्रद्धा ठाकूर, शर्वरी ठाकूर, महादेव ठाकूर, प्रकाश गंगाराम ठाकूर, गायत्री ठाकूर ,अनिल ठाकूर पोलीस पाटील सोमा ठाकूर आदी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी मधुसूदन डांगमोडेकर, युवराज गोसावी, संजीवनी प्रभू, किसन चौधरी, विजया सातार्डेकर, आदी गुरुजनांचा तसेच गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शेवटी श्री. सचिन ठाकूर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशांक ठाकूर यांनी केले यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

You cannot copy content of this page