⚡बांदा ता.१२-: आधुनिक पिढी ही विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गगन भरारी घेत आहे. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण मिळणे दुरापास्त होत असते. पिंगुळीची ग्लोबल फाउंडेशन संस्था मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देऊन नवी झेप घेण्यासाठी पंखांमध्ये बळ देणारी आहे, असे प्रतिपादन न्यू इंग्लिश स्कूल मडुरा प्रशालेचे मुख्याध्यापक सुहास वराडकर यांनी केले.
ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी या संस्थेमार्फत मडुरा हायस्कूल येथे पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दहा दिवसीय संगणक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा ५४ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. तज्ञ मार्गदर्शक स्वप्निल नाईक व प्रथमेश परब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हर्षदा नाईक, निधी किडजी, तन्वी मेस्त्री, स्नेहा केरकर, खुशी पेडणेकर, रिद्धिमा नाईक यांनी मनोगत व्यक्त केले.
ग्रामीण भागातीलच विद्यार्थी कोणत्याही प्रलोभनाशिवाय उत्तम शिक्षण घेत आहेत. यांचे जीवन उज्वल नक्कीच आहे. काही तंत्रज्ञानाच्या सोयीसुविधा यांचा अभाव आहे. ग्लोबल फाउंडेशन ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांनी संवादांमधून संपर्क वाढवत राहिला पाहिजे, असे मार्गदर्शन ग्लोबल फाउंडेशनचे संचालक प्रसाद परब यांनी केले.
