राजन कोरगावकर यांना विश्वास;
प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणूक
⚡ओरोस ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी निवडणूक 14 मे रोजी होणार असून निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे.विरोधकांनी कितीही खालच्या पातळीवर जाऊन अपप्रचार केला तरीही गेली 22 वर्षे पारदर्शक व सभासदाभिमुख पतपेढीचा कारभार करून सभासदांमध्ये विश्वास निर्माण करणा-या भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेल च्या सर्व 15 ही जागा निवडून येणार आणि विरोधकांचा पराभवाने सुपडा साफ होणार अशी प्रतिक्रीया भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलचे प्रमुख श्री राजन कोरगावकर यांनी प्रसिध्दीपत्रकाने दिली आहे.
भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेल व प्राथमिक शिक्षक समितीने गेली अनेक वर्ष सातत्यपूर्ण शिक्षकांच्या विविध ज्वलंत प्रश्नांना न्याय देण्यासाठी आंदोलने, मोर्चा, निदर्शने, संप अशी लोकशाहीतील विविध आयुधे वापरून सतत कार्यरत आहे.ज्यांना शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत कोणतेही देणेघेणे नाही,कोणतेही आंदोलन, मोर्चा, संप करायचा नाही आणि फक्त स्वार्थासाठी पाच वर्षांनी पतपेढी निवडणूक जाहिर झाली की प्रसिद्धीचा भपका करत सर्वसामान्य शिक्षकांची दिशाभूल करायची यामुळेच विरोधकांकडे कोणतेही ठोस प्रचाराचे मुद्दे नसल्याने पातळीसोडून वैयक्तिक टिका, अपप्रचार करीत आहेत.
परंतू प्राथमिक शिक्षक हे सुज्ञ मतदार आहेत ते या अपप्रचार व भूलथांपांना बळी पडणार नसून 14 मे रोजी पाटी या निवडणूक चिन्हावर मतदान करून भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेल च्या सर्व 15 ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देवून विरोधकांचा सुपडा साफ करून परिवर्तन करतील. असा घणाघात श्री राजन कोरगावकर यांनी केला आहे.
