सुप्रीम कोर्टाच्या सत्तासंघर्षाच्या निकालावर माजी मंत्री प्रवीण भोसलेंची प्रतिक्रिया
सावंतवाडी ता.११-:
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने दिलेला निर्णय एकनाथ शिंदे सरकारला चपराक आहे. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने एकनाथ शिंदे सरकारबाबत व्यक्त केलेली मते पाहता नैतिकदृष्ट्या एकनाथ शिंदे सरकारने राजीनामा देणे आवश्यक आहे ,असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रवीण भोसले यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाचे मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता तर आपण त्यांना मुख्यमंत्री म्हणून पुन्हा स्थापित करण्याबाबत पुनर्विचार केला असता असे मत व्यक्त केले आहे.
यातूनच एकनाथ शिंदे हे घटनाबाह्य रीतीने मुख्यमंत्री झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे त्यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा देणे आवश्यक आहे असे मत भोसले यांनी व्यक्त केले आहे खंडपीठाने महाराष्ट्राच्या तत्कालीन राज्यपालावरही ताशेरे ओढले आहेत. त्याशिवाय विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू असताना भरत भोगावले यांची पक्षप्रतोत म्हणून केलेली नियुक्तीही ही सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने बेकायदेशीर ठरवली आहे. त्याशिवाय विधिमंडळ पक्ष आणि पक्ष याबाबत सुप्रीम कोर्टाने स्पष्ट मत मांडले आहे .
विधिमंडळ पक्ष हा पक्ष होत नाही त्यामुळे विधिमंडळ गटनेता किंवा पक्ष प्रतोद ठरवण्याचा अधिकार राजकीय पक्षाला असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे या सर्व बाबी पाहता सुप्रीम कोर्टाने एक प्रकारे एकनाथ शिंदे सरकारला चपराक दिली आहे त्यामुळे त्यांनी त्वरित राजीनामा देणे आवश्यक आहे असे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
