मसुरे डांगमोडे येथील प्राथमिक विद्यामंदिरचा १४ रोजी शतवार्षिकोत्सव

⚡मालवण ता.११-: मसुरे डांगमोडे येथील प्राथमिक विद्यामंदिर या शाळेला शंभर वर्षे पूर्ण होत असून प्राथमिक विद्यामंदिर शतक महोत्सव समिती आणि नवतरुण मित्रमंडळ डांगमोडे यांच्या वतीने दि. १४ मे रोजी शाळेचा शतवार्षिकोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत.

दि. १४ मे रोजी सायंकाळी ४ वाजता प्राथमिक विद्यामंदिर डांगमोडे शाळेच्या पटांगण येथे शतवार्षिकोत्सव समारंभ होणार आहे. या समारंभास अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार वैभव नाईक, माजी जि. प. अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती छोटू ठाकूर, मसुरे केंद्रप्रमुख नारायण देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या समारंभात आजपर्यंत शाळेत ज्ञानदान केलेल्या सर्व शिक्षकांचा सन्मान, सन २०२२- २३ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेणाऱ्या गावातील सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार, गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांचा सन्मान, विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ग्रामस्थांचा सन्मान, राजेंद्र विठ्ठल ठाकूर, आणि हेमंत विठ्ठल ठाकूर यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन, शाळेच्या ग्रंथालयाचे उदघाटन तर रात्री १० वाजता दशावतार नाटक सादरीकरण आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी या समारंभास शाळेचे सर्व आजी माजी विद्यार्थी, आजी माजी शिक्षक, ग्रामस्थ, हितचिंतक आदी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शतक महोत्सव समिती व नवतरुण मित्रमंडळ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page