धार्मिक उत्सवासाठी गेल्याचा चोरट्यांनी घेतला फायदा

दोन घरे फोडली: २१ हजारांची रोख रक्कम लंपास;ओटवणे देऊळवाडी येथील घटना

⚡सावंतवाडी ता.११-: धार्मिक उत्सवासाठी रात्री घरातील सर्वजण गेल्याची संधी साधत रस्त्यालगतची दोन घरे फोडून एका घरातील कपाटातील सुमारे २१ हजार रुपयाची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ओटवणे देऊळवाडी येथे घडली. सुदैवाने या दोन्ही घरातील एका विशिष्ट ठिकाणी ठेवलेल्या सोन्याच्या वस्तू या चोरट्यांच्या हाताला लागल्या नाहीत अन्यथा चोरीचा आकडा वाढला असता. दरम्यान भर वस्तीत आणि जवळच उत्सव सुरु असतानाच हा धाडसी चोरीचा प्रकार घडल्यामुळे ओटवणे परीसरात खळबळ उडाली आहे.

ओटवणे रवळनाथ मंदिर ते शेरवाळेवाडी मुख्य रस्त्यालगत राजन बापू गावकर आणि सविता संजय माठेकर यांची घरे आहेत. शेरवाळेवाडीत वार्षिक उत्सव असल्याने रात्री या दोन्ही घरातील सर्वजण त्याठिकाणी गेले होते. नेमकी हीच संधी साधून चोरट्याने रात्री साडे नऊच्या दरम्यान दोन्ही घराचे दरवाजे कटावणीने फोडून घरात प्रवेश केला. या चोरट्यानी राजन गावकर यांच्या घरातील दोन्ही कपाटे लक्ष करीत या कपाटातील सुमारे हजार २१ रुपयाची रोख रक्कम लंपास केली. तसेच आतील साहित्य विस्कटुन टाकले. आणि मागील दारातून पसार झाले. राजन गावकर यांचा गावठी कोंबडी विकण्याचा व्यवसाय असल्यामुळे त्या विकून त्यांनी हे पैसे कपाटात ठेवले होते. त्यानंतर सविता माठेकर यांचे घर लक्ष करीत त्यांच्या घराचा दरवाजा फोडून घरात प्रवेश केला. मात्र त्यांच्या घरात चोरट्यांना काही साफडले नाही. सुदैवानेच या दोन्ही घरातील सोन्याच्या वस्तू
एका विशिष्ट ठिकाणी ठेवलेल्या असल्यामुळे
या चोरट्यांच्या नजरेपासून दूर राहिल्या. अन्यथा चोरीचा आकडा वाढला असता. या चोरीची माहिती त्यांनी पोलिस पाटील लक्ष्मण गावकर यांना दिल्यानंतर त्यांनी सावंतवाडी पोलीस स्थानकाला कळविताच पोलिस हवालदार महेश जाधव, प्रसाद कदम, पोलिस कॉन्स्टेबल भूषण भोवर, पोलिस कॉन्स्टेबल भूषण भोवर, होमगार्ड संदिप पाटील, गजानन मेस्त्री तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या चोरीची माहिती घेतली.
धार्मिक उत्सवामुळे या घरात नसल्याची संधी साधूनच चोरट्याने हा डाव साधला त्यामुळे चोरटे माहितगार असल्याचे स्पष्ट होते.

You cannot copy content of this page