ओवळीये येथील माजी सरपंच खून प्रकरण;संशयित अजित सावंत यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी
सावंतवाडी : भावानेच मोठ्या भावाच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून केल्याचे उघड झाले असून या खून प्रकरणान अजित रामा सावंत ( रा. ओवळीये वरचीवाडी ) याच्यावर सावंतवाडी पोलिसांनी भादवि कलम ३०२ नुसार खूनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला येथील न्यायालयाचा जर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. परिस्थितीजन्य पुरावे तसेच श्वानापथकाने माग दाखविल्यानंतर मृत लवू सावंत यांचा दत्ताभाऊ असलेल्या अजित सावंत याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयित अजित सावंत याच्या चप्पलावर तसेच टोपीवर रक्ताचे डाग आढळले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दरम्यान, या गुन्ह्यात पुरावे जरी मिळाले असले, तरी आपण खून केलाच नाही अशी भूमिका संशयित अजित सावंत याने घेतली आहे. त्यामुळे मोबाईल सी. डी. आर च्या माध्यमातून तसेच अन्य पुराव्याच्या शोधात आम्ही आहोत. या प्रकरणात आणखी काही जण असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी स्पष्ट केले.
