चित्र-नाट्य अभिनेत्री तारका पेडणेकर यांचे प्रतिपादन
⚡मालवण ता.०२-: विध्यार्थ्यांच्या साहित्यिक कला गुणांना त्यांच्यातील साहित्यिकाला वाव मिळावा म्हणून भंडारी ए. सो. हायस्कुलने सुरु केलेला शलाका वार्षिकांकाचा उपक्रम हा स्तुत्य असून शलाका वार्षिकांकातून उद्याचे साहित्यिक निर्माण होतील असे प्रतिपादन चित्रनाट्य अभिनेत्री तारका पेडणेकर यांनी येथे बोलताना केले.
मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेजच्या वतीने विध्यार्थ्यांच्या साहित्याचा अंतर्भाव असणाऱ्या शलाका या वार्षिकांकाचे प्रकाशन चित्रनाट्य अभिनेत्री तारका पेडणेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक वामन खोत, सहाय्यक शिक्षक आर. डी. बनसोडे, मातृत्व आधार फाउंडेशनचे संचालक दादा वेंगुर्लेकर, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, सहाय्यक शिक्षिका संजना सारंग, सुनंदा वराडकर, ज्योती मॅडम आदी व इतर उपस्थित होते. प्रारंभी मुख्याध्यापक वामन खोत यांनी स्वागत केले तर प्रफुल्ल देसाई यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी बोलताना अभिनेत्री तारका पेडणेकर म्हणाल्या, भंडारी हायस्कुलने शलाका हा वार्षिकांकाचा उपक्रम राबवला यासाठी खरच शाळेचे खूप कौतुक वाटते. मी ज्या शाळेत होते त्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे परंतु विध्यार्थ्यांच्या कलेला, लेखकाला वाव मिळावा यासाठी भंडारी हायस्कुलने हा जो उपक्रम राबवत आहे ही खरच खूप मोठी गोष्ट आहे असे सांगून त्या म्हणाल्या विद्यार्थ्यांमध्ये कितीतरी लेखक, कवी, ऍक्टर दडलेले असतात त्यांना योग्य प्लॅटफॉर्म मिळत नाही आणि मुंबई सारख्या ठिकाणी किंवा मोठ्या शहरांमध्ये खूप सारे प्लॅटफॉर्म उपलब्ध असतात पण आपल्या गावाच्या ठिकाणी तुमची शाळा हे उपक्रम राबवून एक प्लॅटफॉर्म निर्माण करते ही बाब कौतुकास्पद आहे या शाळेचे माजी विध्यार्थी वेगवेगळ्या कला क्षेत्रात आज नावाजलेले आहेत आणि या सगळ्याचे श्रेय हे शाळेचे आणि इथल्या गुरुजनांचे आहे. आई वडील आपल्यावर ज्याप्रमाणे संस्कार करतात त्याचप्रमाणे शाळा , आपले शिक्षक यांचा देखील यामध्ये मोलाचा वाटा असतो म्हणून विद्यार्थ्यांनी शाळेचे ऋण न विसरता जीवनाचा मार्ग चोखळावा असे आवाहन तारका पेडणेकर यांनी केले यावेळी तारका पेडणेकर यांचा मुख्याध्यापक वामन खोत यांच्या हस्ते शाल व श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला
