भंडारी समाजाची ओळख कायम ठेवण्यासाठी सर्वांनी अशीच एकजूट कायम ठेवा

वासुदेव माडये यांचे प्रतिपादन; भंडारी मेळाव्याला युवक- युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

मालवण दि प्रतिनिधी
कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज पुन्हा एकदा जोमाने उभा राहतोय हे पाहून आनंद वाटत असून आगामी काळात भंडारी समाज पुढे नेण्यासाठी युवा समाज बांधवांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून समाजासाठी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे त्यासाठी आमची सदैव साथ त्यांना असेल. समाजात अन्यायाविरुद्ध पेटून उठणे आणि नेहमी सहकार्य करण्यासाठी तत्पर असणे ही आपल्या समाजाची ओळख आहे ही ओळख अशीच कायम ठेवण्यासाठी समाज बांधवांनी नेहमी एकजूट कायम ठेवा असे आवाहन भंडारी महासंघाचे अध्यक्ष वासुदेव उर्फ मामा माडये यांनी कट्टा येथील आयोजित भंडारी समाजाच्या मेळाव्या दरम्यान बोलताना केले.

मालवण तालुक्यातील कट्टा येथील ओम गणेश साई मंगल कार्यालयात कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज कट्टा यांच्यावतीने सत्कार समारंभ व वधू - वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ मामा माडये यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून व श्री गणरायाच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा भंडारी संघाचे माजी अध्यक्ष अतुल बंगे, माजी जिल्हा सचिव राजू गवंडे, सुनील नाईक, वासुदेव पावसकर, आनंद वराडकर, लता खोत, सतीश वाईरकर, मंदार वराडकर, मनमोहन डीचवलकर, मामा बांदिवडेकर, प्रदीप आवळेगावकर, रमेश वाईरकर, सतीश कांबळी, दिलीप वेंगुर्लेकर, अशोक पराडकर, श्रद्धा केळुस्कर, मनीषा वराडकर, बाबुराव मसुरकर, उदय वायंगणकर, सपना पावसकर, सौ. नार्वेकर, सौ.  खोत आदी मान्यवर उपस्थित होते.  या कार्यक्रमादरम्यान कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ यांच्यावतीने पंचक्रोशीतील कट्टा, पेंडूर, काळसे, धामापूर, आंबेरी, चौके, कुणकवळे, गोळवण, वडाचा पाट, गावराई, मसुरे,  नांदोस, वराड, तळगाव, सुकळवाड या भागातून निवडणुकीत विजयी झालेले सरपंच, उपसरपंच, ग्रा. प. सदस्य, आजी माजी सभापती, उपसभापती, सरपंच उपसरपंच, ग्रा. प. सदस्य यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.  तसेच समाजातील विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ऍड श्वेता तेंडूलकर, ऍड प्रदीप मिठबावकर, डॉ सोनाली पावसकर, अनिल पाटील, वैभवी पेडणेकर या समाज बांधवांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी वासुदेव पावसकर, सुनील नाईक, बाबुराव मसुरकर, सपना पावसकर, सौ खोत सौ नार्वेकर सत्कारमूर्ती श्वेता तेंडुलकर सोनाली पावसकर यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. 

या मेळाव्यात विवाह इच्छुक युवक आणि युवती यांचा मोठा प्रतिसाद लाभला सुमारे साडेतीनशे जणांनी आपली विवाह नोंदणी या मेळाव्या दरम्यान नोंदविली या पुढील कालावधीत याबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक समाज बांधवांनी ओम गणेश साई मंगल कार्यालय येथे संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

भंडारी समाज एकत्रित करून पुन्हा नव्याने समाजाला उभारी देणारे व मेळावा यशस्वी करण्यासाठी धडपड करणारे समाज बांधव मंगेश माडये, निलेश हडकर, सुरेश कांबळी, मामा बांदिवडेकर, प्रदीप मिठबावकर, विशाल वाईरकर, प्रकाश सरमळकर, विद्याधर चिंदरकर, गणेश विजय वाईरकर, गणेश रमेश वाईरकर, वासुदेव पावसकर, अशोक पराडकर, संजय नाईक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय नाईक यांनी तर प्रस्ताविक प्रदीप मिठबावकर यांनी व आभार प्रकाश सरमळकर यांनी मानले.

You cannot copy content of this page