⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे गावचे युवा दशावतार कलाकार श्रीराम साईल यांना राज्यस्तरीय युवा कला गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्धल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
साईल हे गेल्या दहा वर्षांपासून दशावतार कला क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारत अखंडितपणे कलासंच चालवत आहेत. त्यांची कलेतील विविध पात्रे सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. सध्या साईल हे श्री. हेळेकर दशावतार नाट्य मंडळ, कारिवडे यांच्या नाट्य मंडळात कार्यरत असून, या कला क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका सादर करत त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. साईल हे सध्या दशावतार नाट्य मंडळात विविध प्रकारच्या स्त्री भूमिका साकारत असून, त्या भूमिका सातत्यपूर्ण व रसिकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यांच्या याच कलेची दखल घेत,आर्ट बिट फाऊंडेशन या संस्थेने त्यांना युवा कला गौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. या पुरस्कारविषयी श्रीराम साईल यांना विचारले असता ते म्हणाले की, या सर्व यशामध्ये आपले गुरुवर्य व आई वडीलांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. गुरुवर्य सचिन पालव, सुहास गावडे, मयूर गवळी, कौशल मेस्त्री यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. तसेच रसिक प्रेक्षकांची वेळोवेळी आपल्या कलेला मिळालेली साथ व आपल्या सहकारी कलाकारांच्या सहकार्याने आपल्याला हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
