वासुदेव भोगले : 1 मे रोजी गटविकास अधिकारी कार्यालयासमोर छेडणार उपोषण
बांदा : प्रतिनिधी
बांदा शहरातील निमजगा, गवळीटेम्ब व गडगेवाडी या तिनही वाडीना पाणीपुरवठा करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण प्येयजल कार्यक्रम अंतर्गत नळपाणी पुरवठा योजना २०१९ मध्ये पुर्ण करण्यात आली. या योजनेसाठी ५० लाख रुपये खर्च करून देखिल या योजनेचा ग्रामस्थांना योग्य प्रकारे उपभोग घेता येत नसुन त्यात त्रुटी आढळत आहेत. त्यामुळे या गंभीर प्रश्नांविरोधात दोषीवर कारवाई व्हावी. समान्य जनतेला योग्य तो न्याय मिळावा यासाठी १ मे रोजी महाराष्ट्र दिनी गटविकास अधिकारी कार्यालय सावंतवाडी येथे बांदा ग्रामस्थ्यांसह उपोषण करण्याचा निर्णय वासुदेव विजय भोगले यांनी घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, या संदर्भात ग्रामपंचायतीला वेळोवेळी लेखी अर्ज माहितीच्या अधिकाराखाली देण्यात आला होता. ग्रामस्थांची सभा होऊनही सदर प्रश्न निकाली लागला नाही. त्या विरोधात २६ ऑगस्ट २०२२ रोजी ग्रामपंचायत बांदा येथे उपोषण केले होते. त्यावेळी प्रश्न लवकर निकाली लावू असे लेखी आश्वासन बांदा ग्रामपंचायतीने देऊन सुद्धा त्याची योग्य ती अंमलबजावणी अद्यापपर्यंत केली नाही.
बांदा ग्रामपंचायतीने ग्रामसभेमध्ये ५० टक्के पाणीपट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बांदा शहरात किमान १६०० अधिकृत पाणी जोडणी आहेत, तेवढीच अनअधिकृत नळपाणी जोडणी बांदा शहरामध्ये सापडतील. त्याचा अतिरीक्त बोजा अधिकृत नळपाणी जोडणीवर येत आहे. पाणीपट्टी वाढविण्याअगोदर अनअधिकृत जोडणी आणि मागील पाणीपट्टी थकबाकी गोळा करावी आणि नंतर पाणीपट्टीवाढीचा निर्णय घ्यावा असेही त्यांनी म्हटले आहे.
