तीलारीच्या कालव्यात बुडून कामगाराचा मृत्यू

दोडामार्ग | प्रतिनिधी
दोडामार्ग म्हावळणकरवाडी येथे तिलारी धरणाच्या डाव्या कालव्यात एक युवक बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे. बाळकृष्ण सिद्धगोविंद सोनाने (४७ वर्षे, रा. हुबळी कर्नाटक) असे त्याचे नाव असून सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली आहे.
मयत बाळकृष्ण सोनाने हा कोनाळकट्टा येथील एका ठेकेदाराकडे कामास होता. सोमवारी तो एकटाच म्हावळणकरवाडी येथील तिलारी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात आंघोळीसाठी उतरला. लगतच कालव्याचे काम सुरू असल्याने दुसरे कामगार तेथे होते. आंघोळीसाठी कालव्यात उतरलेला बाळकृष्ण न दिसल्याने तो बहुधा बुडाला असावा असा अंदाज लावत दुसऱ्या कामगारांनी कालव्यात उडी घेतलीव व बाळकृष्ण यास बाहेर काढले. त्या कामगारांनी लागलीच बाळकृष्ण यास येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तो मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले व याबाबतची माहिती येथील पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद केली व पुढील चौकशी पोलिस करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली.

You cannot copy content of this page