मळगाव येथील सुयोग कलामंचाच्यावतीने ज्येष्ठ दशावतार कलाकारांचा सत्कार

⚡सावंतवाडी ता.२४-: मळगाव-तेलकाटावाडी येथील सुयोग कलामंचाच्यावतीने दरवर्षी होणाऱ्या वार्षिक नाट्य प्रयोगाच्या निमित्ताने दशावतार क्षेत्रात काम केलेल्या ज्येष्ठ दशावतार कलाकारांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मंडळाच्या रंगमंचावर हा सत्कार सोहळा पार पडला.

यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र परब, सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सरपंच निलेश कुडव, गुरुनाथ गावकर, सदस्य प्रेमनाथ राऊळ, मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मुळीक, ऍड. अंकुश ठाकूर, विश्वनाथ गोसावी, महेश गवंडे तसेच सत्कारमूर्ती गजानन लातये, संतोष गावडे, गंगाराम राऊळ, बाबल नाईक, आनंद राऊळ पत्रकार सुखदेव राऊळ व सुयोग मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सुयोग मंडळातील सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मळगाव दशावतार मंडळात काम केलेल्या कै. सखाराम उर्फ बाबी लातये यांचा सत्कार पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र परब यांच्या हस्ते त्यांचा पुत्र गजानन लातये याने स्वीकारला. मळगाव दशावतार मंडळातील कै. बाळकृष्ण गावडे यांचा सत्कार माजी सरपंच निलेश कुडव यांच्या हस्ते त्यांचा पुत्र संतोष गावडे याने स्वीकारला. गुरुवर्य बाबल नाईक यांचा सत्कार उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच गंगाराम राऊळ यांचा सत्कार गुरुनाथ गावकर यांच्या हस्ते करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मुळीक यांचा सत्कार विजू खानोलकर तर गणेश तळीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आनंद राऊळ यांचा सत्कार ऍड. अंकुश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मोरेश्वर दशावतार मंडळाचे मालक यांचाही सत्कार सरपंच स्नेहल जामदार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांनी आपल्या भाषणात मंडळाने राबविलेल्या या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मान्यवरांचे आभार तुषार वालावलकर यांनी मानले. त्यानंतर मोरेश्वर दशावतार मंडळाचा अकल्पासुर वध हा नाट्यप्रयोग पार पडला. या नाट्यप्रयोगाला नाट्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

You cannot copy content of this page