बाबा मोंडकर: कोळंब येथे बोलताना केले प्रतिपादन
मालवण (प्रतिनिधी)
प्रत्येक गावातील वर्तमान स्थिती लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचे भविष्यातले जगणे सुसह्य करण्यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ विचारपूर्वक नियोजन करत आहे. प्रत्येक गाव पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ सज्ज आहे. यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे, असे प्रतिपादन पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू उर्फ बाबा मोंडकर यांनी केले.
कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बाबा मोंडकर बोलत होते. पर्यटन महासंघाने कोकण जल बाजारात आणले आहे. त्याचे उद्दिष्ट पैसे कमावणे हा नसून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन जगापर्यंत पोहोचवणे हाच आहे. कोकण जलच्या बॉटलवर एक क्यूआरकोड छापण्यात आला आहे. या कोडमध्ये संपूर्ण जिल्ह्याची माहिती दिलेली आहे. जेणेकरून आलेल्या पर्यटकांना योग्य मार्गदर्शन होणार आहे, असेही मोंडकर म्हणाले.
पर्यटन व्यावसायिक महासंघ संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचे रोलमॉडेल तयार करत आहे. याकरिता प्रशासनासोबत पर्यटन महासंघ प्रयत्न करत आहे. प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये जाऊन त्या गावातील माहिती गोळा करणे, त्या त्या गावातील भौगोलिक स्थितीनुसार योग्य बदल करुन घेणे, प्रत्येक गावातील मंदिरे आणि त्याचे पौराणिक किवा ऐतिहासिक महत्त्व, त्या गावात असलेला एखादा ऐतिहासिक वाडा, त्या गावात असलेली बावर, देवराई, किल्ला अशा इतर गोष्टींची एक वेबसाईट बनवून त्याचा क्यूआरकोड प्रत्येक गावाच्या चौकात लावणे, सोबत स्थानिक व्यवसाय आणि व्यावसायिकांची संपर्कासह माहिती या क्यूआरकोड मध्ये समाविष्ट करणे, असे नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मान्य केले. या कार्यक्रमात आठही तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. सर्वच तालुक्यातील सरपंच तसेच ग्रामसेवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यात जिल्हाधिकारी. के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे सीईओ प्रजित नायर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, उपकार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, व्हि. एम. नाईक, जयप्रकाश परब, आप्पासाहेब गुजर, विजय चव्हाण, तसेच भारत पर्यटन, पश्चिम विभागीय कार्यालय मुंबई, महाराष्ट्र पर्यटन संचानालय, कोकण इतिहास संकलन समिती, सिंधुदुर्ग, डिस्कव्हरी ऑफ सिंधुदुर्ग, पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर, सचिव अॅड. नकुल पार्सेकर, कार्याध्यक्ष सतीश पाटणकर, सोशल मीडियाचे किशोर दाभोलकर, उपाध्यक्ष वैभववाडी सुधीर नकाशे, उपाध्यक्ष दोडामार्ग संजय सावंत, प्रसन्न उर्फ बाळू देसाई, सावंतवाडी अध्यक्ष जितेंद्र पंडित, मालवण अध्यक्ष अविनाश सामंत, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष महेश सामंत, संतोष काकडे उपाध्यक्ष कणकवली, शिवदास मसगे, मालवण शहर अध्यक्ष मंगेश जावकर यांचा मोलाचा वाटा आहे, असेही मोंडकर म्हणाले.
