करवसुलीसह अन्य उपक्रमात राज्यात कणकवली न.पं.प्रथम

नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या टीमवर्कचे फलित

⚡कणकवली ता.२०-: कणकवली नगरपंचायतच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला असून, नगरपंचायतची कर वसुली व अन्य राबविलेल्या विविध उपक्रमाबाबत कणकवली नगरपंचायतला राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव डॉ. सोनिया सेठी यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर विकास दिनानिमित्त या पारितोषिकाचे वितरण कणकवली नगरपंचायतचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांना वितरण करण्यात आले. कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, यांच्यासह मुख्याधिकारी व नगरपंचायतच्या कर्मचारी वर्गाने गेल्या काही वर्षात केलेल्या कामाचा हा गौरव राज्य शासनाकडून करण्यात आला. कणकवली नगरपंचायतने यापूर्वी स्वच्छ सर्वेक्षण मध्ये मानांकन मिळवले असून, नगरपंचायतने अनेक विविध पुरस्कार देखील मिळवले आहेत. याच सोबत आता कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे तसेच मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या टीमने गेल्या काही वर्षात राबवलेले विविध उपक्रम याची राज्य सरकारने दखल घेतली असून, याचाच एक भाग म्हणून राज्यात नगरपंचायत वर्गवारी मध्ये कणकवली नगरपंचायत चा प्रथम क्रमांक आला आहे. या यशाबद्दल कणकवली नगरपंचायत च्या विद्यमान पदाधिकारी व कर्मचारी यांच्यासह सर्वांचे अभिनंदन केले जात आहे.

You cannot copy content of this page