कालावल खाडीपात्रात बेकायदेशीर वाळू उत्खनन प्रकरणी बंदर विभागाची धडक कारवाई

⚡मालवण ता.१८-: कालावल खाडीपात्रात काही ठिकाणी वाळू उत्खनन परवाना क्षेत्राबाहेर बेकायदेशीर वाळू उत्खनन होत असल्याने खाडी परिसरातील बेटांना धोका पोहोचत असल्याचा आरोप खोत जुवा बेटावरील ग्रामस्थांनी केल्यानंतर आज मालवण बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसोबत कालावल खाडीपात्रात धडक कारवाई मोहीम राबवली. या मोहिमेत परवाना क्षेत्राबाहेरच्या परिसरात आठ होड्या सापडून आल्याने या आठही होड्या खाडी किनाऱ्यावर आणण्यात येऊन संबंधित होडी मालकांचे जाब जबाब नोंदविण्यात आले असून उद्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतरच त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती मालवण बंदर विभागाचे बंदर निरीक्षक सुहास गुरव यांनी दिली आहे

दरम्यान, ज्या नौका नियमबाह्य पद्धतीने उत्खनन करत असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.

यासंबधीचे अधिक वृत्त असे की, कालावल खाडी पात्रातील सी १ वाळू उत्खनन क्षेत्रात १८ होड्याना परवानगी आहे. असे असताना ज्या आठ होड्या सापडून आल्या आहेत त्या परवाना धारक आहेत का ? याची माहिती घेतली जाणार आहे. तसेच होड्या मालकांचे जबाब नोंद करून घेतले जाणार आहेत. वाळू उत्खनन परवाना बाबत माहिती घेतली जाणार आहे. होड्यां कागदपत्रे यांची तपासणी होणार आहे. त्यानुसार जर कोणी नियमबाह्य आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे सहाय्यक बंदर निरीक्षक सुहास गुरव, अरविंद गुरव यांनी माहिती देताना सांगितले. यावेळी महसूल विभाग आचरा मंडळ अधिकारी अजय परब, मसुरे मंडळ अधिकारी सुहास चव्हाण, चिंदर तलाठी संतोष जाधव, देऊळवाडा तलाठी लखमोड, पोलीस कर्मचारी फारांदे, वायंगणी पोलीस पाटील सुनील त्रिम्बक्कर, चांदेर पोलीस पाटील सोनल भोगले यासह ग्रामस्थ अनिल खोत व अन्य उपस्थित होते.

यावेळी अधिकृत वाळू संघटना जिल्हा अध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनी अनधिकृत वाळू उत्खनन विरोधात ग्रामस्थांची भूमिका योग्य असल्याचे सांगत त्यांनी ग्रामस्थांना पाठिंबा दर्शवला.

खोत जुवा बेटा जवळ वाळू उत्खननास परवानगीच नको

खोत जुवा बेटापासून दोन्ही बाजूला १ किलोमीटर क्षेत्रात वाळू उत्खननास परवानगीच देऊ नये. तसेच रात्री सुरू असणारे अनधिकृत वाळू उत्खनन थांबवावे. होड्यांची तपासणी करून ज्या होड्या अनधिकृत असतील त्यावर कारवाई व्हावी. अस्वच्छता पसरवणाऱ्या वाळू कामगारांवर कारवाई करावी. येथील बेटे व पांडवकालीन बंधारा यांचे संरक्षण व्हावे या दृष्टीने प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. अशी मागणी ग्रामस्थानी बंदर अधिकारी व महसूल अधिकारी यांच्याकडे केली आहे.

You cannot copy content of this page