तेरेखोल नदिकडील रस्त्याचे काम आठ दिवसात करा

अन्यथा जल वाहिनीचे काम रोखणार;
उपसरपंच जावेद खान यांचा इशारा

बांदा/प्रतिनिधी
बांदा-आळवाडी येथील तेरेखोल नदीपात्रात जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने जलवाहिनी नेण्यासाठी उभारण्यात आलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूकडील जोडरस्त्याचे काम हे येत्या ८ दिवसात सुरु न केल्यास पाईपलाईनचे काम करण्यास मज्जाव करण्यात येईल असा इशारा बांदा उपसरपंच जावेद खतीब यांनी जीवन प्राधिकरणचे अधिकारी व ठेकेदार यांना दिला आहे. आज या पुलाच्या जोडरस्त्याची पाहणी करण्यात आली.
जीवन प्राधिकरण विभागाची जलवाहिनी सासोली ते वेंगुर्ले अशी प्रस्तावित आहे. बांदा तेरेखोल नदीपात्रातून जलवाहिनी नेण्यासाठी पुलाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र पुलाला जोडरस्त्याचे काम हे अपूर्ण असल्याने स्थानिक जीव मुठीत घेऊन वाहने चालवत आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूकडील जोड रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी स्थानिकांनी तसेच शेर्लेवासियांनी वेळोवेळी आंदोलनाचा इशारा देखील दिला होता.
प्रत्येकवेळी प्राधिकरण कडून कारणे देऊन विषयाला बगल देण्यात येत होती. बांदा उपसरपंच जावेद खतीब व स्थानिक प्रशासनाने यासंदर्भात लक्ष घालत जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना काम करू न देण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत जीवन प्राधिकरण विभागाने ठेकेदाराला सूचना देत आज तात्काळ पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आज सकाळीच संबंधित पुलाचे काम करणारे ठेकेदार अमेय शंभुशेठ व धीरज चौगुले हे याठिकाणी दाखल झालेत.
यावेळी उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, शैलेश केसरकर, गौरांग शेर्लेकर, फास्कुल पावल, विलास आळवे, युसूफ आगा यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. याठिकाणी पावसाळ्यात पाण्याचा वेग हा अधिक असल्याने दोन्ही बाजूकडे मातीचा भराव टाकून त्यानंतरच रस्त्याचे काम करण्याची सूचना उपसरपंच खतीब यांनी केली. याठिकाणी वाहतुकीची वर्दळ ही मोठी असल्याने रस्त्याचे काम मजबूत व उच्च प्रतीचे करण्याची मागणी करण्यात आली. तसेच येत्या ८ दिवसात प्रत्यक्ष कामास सुरुवात न केल्यास जलवाहिनीचे काम करू देणार नसल्याचा इशारा यावेळी ठेकेदाराला देण्यात आला.

You cannot copy content of this page