सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाने घेतली ना.दिपक केसरकर यांची भेट
⚡कणकवली ता.०८-: आधार अपडेट नुसार राज्यातील माध्यमिक शाळांची सन 2022-23 ची संच मान्यता करण्याचे शिक्षण विभागाने ठरविले आहे. आधार अपडेटमध्ये अनेक अडचणी येत असून मुख्याध्यापकांसह शालेय प्रशासन नाहक त्रस्त होत आहे. आधार अपडेट मध्ये वारंवार बदल होत असून वेबसाइटमध्ये अडचणी येत आहेत. शाळांमध्ये पुरेशी विद्यार्थी संख्या असून आधार अपडेट झाले नाही तर संच मान्यतेसाठी अपडेट न झालेले विद्यार्थी गृहीत धरले जाणार नाहीत. त्यामुळे शाळांच्या शिक्षक संख्येत घट होऊन शिक्षणावर याचा गंभीर परिणाम होणार आहे. त्यामुळे शाळांमध्ये चिंतेत वातावरण निर्माण झाले आहे.
या बाबींचा विचार करुन आधार अपडेटचा विचार न करता संच मान्यता करावी या मागणीसाठी शिक्षणमंत्री ना. दिपक केसरकर यांची मुख्याध्यापक संघाच्या वतीने भेट घेऊन त्यासंबंधीचे निवेदन दिले आणि चर्चा केली.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे, सचिव गुरुदास कुसगांवकर , दिनेश म्हाडगुत , श्री. ताकीलदार , नंदन घोगळे उपस्थित होते.
