सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ आणि नाट्यसिंधु पुणे यांचा संयुक्त उपक्रम
⚡कणकवली ता.०७-: मालवणी नटसम्राट स्व. मच्छिंद्र कांबळी यांच्या जयंतीनिमित्त थेरगाव डांगे चौक पुणे येथील सिंधुदुर्ग भवन येथे सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ आणि नाट्यसिंधु पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “मालवणी भाषा दिन” साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध मालवणी कला सादर करुन उपस्थितांनी मालवणी भाषा दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व मच्छिंद्र कांबळी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मालवणी पद्धतीने संजय सावंत यांनी गाऱ्हाणे घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी सिटी प्राइड स्कूलच्या संचालिका डॉ. सौ. अश्विनीताई जांभेकर-कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अश्विनीताई म्हणाल्या, “मी आज या कार्यक्रमाला आल्यानंतर मला माझ्या माहेरी आल्यासारखे वाटते. माझ्या वडिलांनाही आपले गाव, कोकणची खूप ओढ होती. शिक्षण क्षेत्रामध्ये वडिलांसोबत काम करत आले. आज सिटी प्राइड ग्रुप ऑफ स्कूलच्या माध्यमातून कोकण वासियांची संस्था या शहरांमध्ये कार्यरत आहे. यापुढेही मला आपणा सर्वांसोबत कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायला आवडेल”. शैक्षणिक क्षेत्रामध्ये काय मदत लागली तर योग्य ते सहकार्य करण्याचा आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे यांनी प्रस्ताविक केले. यावेळी ॲड. हरीश नढे पाटील, सेक्रेटरी ॲड. चंद्रकांत गायकवाड, उपाध्यक्ष अरुण दळवी, खजिनदार धर्मराज सावंत, सहखजिनदार चंद्रकांत साळसकर, सह सेक्रेटरी प्रकाश साईल, कार्याध्यक्ष विश्वास राणे, नाट्य सिंधूचे अध्यक्ष राजेश कांडर, महिला सिंधूच्या सौ. विद्या मेस्त्री, भजन सिंधूचे अध्यक्ष विठ्ठल परब, पांडुरंग देसाई हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
कलाकारांनी मालवणी भाषेमध्ये आपले संवाद साधत कला सादर केली. त्यामध्ये प्रामुख्याने पांडुरंग देसाई, सौ. प्रणिता देसाई, रामचंद्र तावडे, यशवंत गावडे, संतोष परब, सुनील गायकवाड, बाळकृष्ण नाईक, सौ. स्वाती गावडे, सौ. शीतल परब, सौ. सोनाली कांडर यांच्यासह वसंत मुळीक, ओमकार गावडे या बालकलाकारांनी आपली कला सादर करुन मनोरंजन केले. या कार्यक्रमासाठी सभासदांनी मोठ्याप्रमाणात उपस्थितीत राहुन प्रतिसाद दिला.
हा संपुर्ण कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पराग पालकर, आनंद साटलकर, संतोष गावडे, बाळा गुरव, संजय सावंत, अनिल सावंत यांचे विषेश सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष साटम यांनी केले,तर उपस्थितांचे आभार संतोष गावडे यांनी मानले.
