नेटवर्क उपलब्धतेसाठी सरपंचांनी लक्ष घालावे;ग्राम पंचायतचे माजी सदस्य चक्रपाणी गवंडी यांची मागणी
⚡वेंगुर्ले ता.०५-: रेडी गावात अनेक चांगली पर्यटन स्थळे असताना पर्यटनासाठी एक नंबरचा गाव असताना गावातील पायाभूत सुविधा व समस्यामुळे या भागांत पर्यटकांची इच्छा असूनही वस्तीला रहात नाहीत. ते सध्याच्या जिवनाच्या मोबाईल नेटवर्कींग महत्वाचे असताना त्याची मोठी समस्या रेडी गावांत वारंवार सतावतेय. त्यामुळे पर्यटक व्यावसायिकांचे पर्यायाने रेडी ग्रामपंचायतीचेही नुकसान होत आहे. याकडे रेडी सरपंचांनी विशेष लक्ष देवून हि समस्या सोडवावी. अशी मागणी लेखी निवेदनाव्दारे माजी ग्रामपंचायत सदस्य चक्रपाणी गवंडी यांनी मागणी केली आहे.
रेडीचे ग्राम दैवत श्रीदेवी माऊली मंदिराला `क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. त्या माध्यमातून आतापर्यंत मंदिराकडे खूप चांगल्या प्रकारे सुशोभीकरणाची कामे झालेली आहेत. रेडी ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनीधींनी अन्नछत्र, भक्तनिवास व बहुउद्देशीय सभागृह या करीता शासन स्तरावरुन रु. ५ कोटींचा निधी मंजूर करून आणला. रेडीच्या पर्यटन वाढीकरीता खूप चांगली कामे केलेली आहेत.
रेडी गावामध्ये इतर गावापेक्षा पर्यटन पूरक परीस्थिती खुप चांगली आहे. खुप सुंदर अशी समुद्र किनारपट्टी सोबतच पांडवकालीन द्विभुजा गणपती मंदिर, ग्रामदैवत माऊलीचे सुंदर अस मंदिर, ऐतिहासिक वारसा सांगणारा रेडी यशवंतगड, कनयाळ तलाव, हत्तीची सोंड, समुद्र किनाऱ्याला लागून असलेली सुप्रसिध्द अशी घंगाळेश्वर व सिध्देश्वर देवस्थाने, पोहण्यासाठी अतिशय सुरक्षित अशी सिध्देश्वर किनारपट्टी यासह अजून कांही छोटी-मोठी पर्यटन स्थळे, मंदिरे आहेत आणि त्यांची भुरळ आज पर्यटकांना पडत आहे. त्यामुळे रेडीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
रेडीचा काहि वर्षापूर्वी जीर्ण झालेला यशवंतगड शिवप्रेमींनी एकत्र येत गड संवर्धनाच्या माध्यमातून अनावश्यक झाडीझुडपे तोडून चांगल्याप्रकारे साफसफाई पुन्हा एकदा यशवंतगड प्रकाश झोतात आला असून आता मोठया प्रमाणात दुर्गप्रेमी व पर्यटक याठिकाणी येऊ लागलेले आहेत.
रेडीतील सुप्रसिध्द व्दीभुजा गणपती मंदिर व परीसराचा तेथील विनायक कांबळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी, भाविक भक्तांच्या मदतीने चांगला कायापालट केला आहे. त्यामुळे आता याठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे. आता एक भक्त निवास या ठिकाणी झालं तर रेडीतील एक परीपूर्ण देवस्थानात गणले जाईल. याकडे शासनाकडे सरपंचांनी पाठपुरावा करावा. या मंदिरालगत असलेल्या समुद्र किनाऱ्याला स्थानिक रेडीतील होतकरू तरुणांनी मागील दीड वर्षाच्या काळात सागरी पर्यटनाच्या माध्यमातून सागरी सफर, स्कुबा ड्रायव्हिंग सारखे व्यवसाय प्रायोगिक तत्वावर सुरु केले आहेत. त्यांनाही खूप चांगला प्रतिसाद पर्यटकांमधून लाभत आहे. व त्याचा खूप चांगला परीणाम रेडी गावच्या पर्यटन वाढीवर होत आहे.
पर्यटन व्यवसाय वाढीकरीता रेडी गावांत जे पर्यटक येतात, ते रेडी गावांत चांगली पर्यटन स्थळे असताना व ती थांबून पहाण्यासाठी येणाऱया पर्यटकांना चांगल्या जेवणाची व राहण्याची सोयी रेडी गावांत उपलब्ध असताना सुध्दा ते थांबत नाहीत, त्याचे कारण रेडी गावांत सातत्याने उदभवणारी नेटवर्किंग समस्या आहे. शासनाच्या बी.एस.एन.एल चे नेटवर्क मिळणं कठीण झालेलं आहे. बाजूच्या आरोंदा, शिरोडय़ात गेल्यावर चांगलं मोबाईल नेटवर्क मिळते. रेडीतील पर्यटक राहण्याची, जेवणाची चांगली सोय असताना फक्त नेटवर्क नसल्यानं पुढील गावात निघून जात आहे. या समस्येकडेही शासनाने व ग्रामपंचायतीने गांभीर्याने लक्ष देऊन रेडीत चांगलं नेटवर्क येण्यासाठी प्रयत्न करावेत. रेडीतील पर्यटन व्यावसायिक बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना खूप चांगल्या सोयी सुविधा देत असल्यामुळे रेडी गावांत पर्यटक वाढताहेत. कांही रस्त्यांची साईडपट्टी खचून गेल्याने पर्यटकांना अरुंद रस्त्यामुळे वाहन चालविताना त्रास होत आहे. त्यामुळे रस्त्याच्या साईडपट्टीचे काम त्वरीत होण्याची गरज आहे.
पर्यटन विकास वृध्दिंगत होण्यासाठी गावामध्ये चांगल्या पायाभूत सुविधा असणं खूप गरजेचं आहे. आज आपल्या रेडी गावामध्ये चांगली पर्यटन स्थळे, मंदिरे आहेत. मात्र त्याठिकाणी जाणारे रस्ते सुस्थितीत असणं गरजेचं आहे. आपला रेडी-हुडा ते माऊली मंदिर हा रस्ता अलीकडेच झाल्याने थोडाफार सुस्थितीत आहे. मात्र हा रस्ता करताना त्याच्या साईडपट्टीला व्यवस्थित भर न घातल्याने या रस्त्याची साईडपट्टी बऱ्याच ठिकाणी मोठय़ा प्रमाणांत खचलेली आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. सदर रस्त्याची साईडपट्टीचे काम संबंधित विभागामार्फत लवकर व्हावे. जेणेकरून ग्रामस्थ व पर्यटकांना होणारा त्रास कमी होईल. तसेच माऊली मंदिर ते गणपती मंदिर हा रस्ता देखील खूप खराब झालेला आहे. त्यामुळे ग्रामस्थ व भाविकांना खूप त्रास आहे. या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम प्राधान्याने पर्यटनखाली व्हावे. जेणेकरून पर्यटनाला चालना मिळेल. त्याचप्रमाणे श्री देव घंगाळेश्वर देवस्थान हे सुप्रसिध्द आहे. त्याकडे गणपती मंदिराकडून जाणारा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. मात्र या देवस्थानकडे जाताना दुचाकी सोडून अन्य वाहनांना रेडी पोर्टकडून अडवलं जात आहे. हे पर्यटन स्थळ पूर्वीपासून असल्याने स्थानिक व पर्यटकांना तेथे जाण्यास निर्माण होणारी समस्या शासन स्तरावरून सोडविण्यात यावी.
रेडी गावातील या समस्या पर्यटन वृध्दी व पर्यटन रोजगाराने व्यवसाय करणाऱया बेरोजगारांना न्याय मिळावा यासाठी रेडी सरपंचांनी शासनाकडे पाठपुरावा करून त्वरीत सोवाव्यात आपण लवकरात लवकर सोडवाल असा विश्वास आहे. ग्रामपंचायतचे माजी सदस्य चक्रपाणी गवंडी यांनी मागणी केली आहे.
