*💫बांदा दि.१९-:* शुक्रवारी संध्याकाळी बांदा दशक्रोशीत मेघगर्जनांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. आंबा काजूच्या ऐन हंगामात पाऊस आल्याने बागायतदारांवर अस्मानी संकट निर्माण झाले आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे बांदा शहरात बाजारासाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. सुमारे अर्धातास झालेल्या पावसामुळे रहदारी मात्र थांबली होती. गेले चार दिवस सावंतवाडी तालुक्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. येत्या दोन दिवसांत हवामान विभागातर्फे पाऊस लागण्याची शक्यता वर्तवली असून आज बांदा दशक्रोशीतील मुसळधार पाऊस झाला. याचा मोठा फटका आंबा व काजू बागायतदारांना बसला. काढणीयोग्य पीक झाले असून अवकाळी पाऊस लागल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सरकारने याची दखल घेऊन झालेल्या आंबा व काजू पिकाची नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, अशी मागणी आंबा व काजू बागायतदारांमधून होत आहे. *मडुरा पंचक्रोशीतही शिडकाव* दुपारी तीनच्या सुमारास मडुरा पंचक्रोशीतील पाडलोस, मडुरा, रोणापाल, निगुडे,शेर्ले भागांतही वाऱ्यांसह पावसाचा शिडकाव झाला. गवारेड्यांचा धुडगूस सुरू असतानाच आता अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.
बांदा दशक्रोशीत पावसाची जोरदार हजेरी …
