उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींबद्दल केलेले वक्तव्य म्हणजे नौटंकीपणा

कणकवलीत ५ एप्रिलला वीर सावरकर गौरव यात्रा :आ.नितेश राणे

⚡कणकवली ता.२९-:
स्वातंत्र्यवीर
सावरकरांचा विचार घराघरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहोत यासाठी कणकवली शहरात ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजता या वेळेत भव्य वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून कणकवलीत भगवं वादळ निर्माण केले जाणार आहे. वीर सावरकर यांच्यावर सातत्‍याने टीका करणाऱ्या राहूल गांधी यांना अडविण्याची हिंमत मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांच्यात नव्हती. आता सत्ता गेल्‍यानंतर ते राहूल गांधी यांना ठणकवण्याची भाषा करत उद्धव ठाकरे करीत आहेत, ही त्‍यांची नौटंकी असल्याची टीका आ.नितेश राणे यांनी केली.तसेच आगामी काळात भाजपा शिवसेना युती करुनच निवडणुका लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कणकवली येथील प्रहार भवनमधील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत आ.नितेश राणे बोलत होते.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नगराध्यक्ष समीर नलावडे,भाजपा सरचिटणीस मनोज रावराणे ,दामू सावंत आदी उपस्थित होते.

राहूल गांधी, नाना पाटोले आणि काँग्रेसची मंडळी वीर सावरकर यांचा सातत्‍याने अपमान करत आहेत. त्‍यांना योग्‍य तो संदेश देण्यासाठी आम्‍ही ५ एप्रिल रोजी कणकवलीत भव्य अशी वीर सावरकर गौरव यात्रा काढणार आहोत.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेनुसार व भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनानुसार स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा राज्याच्या कानाकोपऱ्यात निघणार आहे. ३१ मार्च ते ७ एप्रिलदरम्यान राज्यभरात ही यात्रा भव्य स्वरूपात काढण्यात येणार आहे.

कणकवलीतील वीर सावरकर गौरव यात्रा भव्यदिव्य असणार आहे. या यात्रेमध्ये सावरकर यांचा रथ असणार आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सावरकर यांच्याविषयी केलेल्‍या भाषणांची चित्रफित दाखवली जाणार आहे. यात शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्‍याचबरोबर हिंदुत्‍ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि सर्व जनतेने सहभाग घ्यावा असे आवाहन आ.नितेश राणे यांनी केले आहे. आम्ही सावरकरांचा विचार घराघरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहोत. या गौरवयात्रेसाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आम. रवी फाटक व ज्या इतर नेत्यांना शक्य आहे, ते यावेत, यासाठीही प्रयत्न आहे. ही यात्रा प्रत्येक मतदारसंघनिहाय असणार आहे. कणकवलीतील या यात्रेचे नियोजनही लवकरच जाहिर करू असे ते म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच वीर सावरकर यांच्याबद्दल आदर बाळगला. सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्या मनीशंकर अय्यर यांना जोडो मारो आंदोलनही बाळासाहेब ठाकरे यांनी छेडले होते. मात्र त्‍यांचे सुपूत्र उद्धव ठाकरे यांनी शांत राहणे पसंत केले. ते मुख्यमंत्री असताना राहूल गांधी यांनी सावरकर यांच्यावर वारंवार टीका केली. परंतु उद्धव ठाकरे यांनी राहूल गांधी यांना अडविण्याची हिंमत दाखवली नव्हती. आता सत्ता गेल्‍यानंतर ते राहूल गांधी यांना ठणकवण्याची भाषा करत आहेत. ही त्यांची नौटंकी आहे ढोंगीपणा आहे,त्याला कोणीही माफ करणार नाही.
ज्या सावरकरांनी हिंदुराष्ट्राची घोषणा केली, त्याच सावरकर यांचा अपमान होत असताना ठाकरे पिता, पुत्र एक शब्दही काढत नाहीत. पं. नेहरू यांनी आपण अपघाताने हिंदु झाल्याचे म्हटले होते. त्यांना आपण हिंदु म्हणून घेण्यासही लाज वाटत होती, अशांचा पणतू असलेल्या राहूल गांधीना थांबविणे, विरोध करण्याची हिंमत सत्ता असताना दाखविली नाही.असा टोला आम.नितेश राणे यांनी लगावला.

ग्रामपंचायत निवडणुकांप्रमाणेच यापुढील सर्व निवडणुका भाजप-शिवसेना युतीच्या माध्यमातून आम्‍ही लढविणार आहोत. महाविकास आघाडीने अडीच वर्षात आम्‍हाला प्रचंड त्रास दिला. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकले काहींवर केसेस दाखल केल्‍या. आम्‍हाला झालेला हा सगळा त्रास बाहेर काढण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना एकत्र येऊन नवीन सरकार स्थापन करावं लागले. ग्रामपंचायत निवडणूक आम्‍ही युतीच्या माध्यमातून लढवली. त्‍याच धर्तीवर जिल्‍हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका देखील आम्‍ही युतीच्या माध्यमातून लढविणार आहोत. युतीत कोणतेही वाद नाहीत उलट चांगल्‍या समन्वयाने काम सुरु आहे. राज्‍यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असे शिवसेना-भाजप युतीचे सरकार आहे. यात शिवसेनेचे चाळीस आणि दहा अपक्ष आमदार यांचा मोठा वाटा आहे. हे आमदार आमच्यासोबत आले म्‍हणूनच युतीचे सरकार होऊ शकले आहे. त्‍यामुळे भाजप आणि शिवसेनेची युती ही यापुढे देखील कायम राहणार असल्याचे आ.नितेश राणे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page