मडुऱ्यातील पालकांचा मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्धार….

मडुरा हायस्कूलमध्ये पालक, शालेय समिती व शिक्षकांची बैठक ः प्रशासनाने जबाबदारी घ्यावी

*💫बांदा दि.२२-:* राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने एकीकडे प्रशासनाकडून थंडीत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे तर दुसरीकडे शिक्षणविभागाकडून नववी व दहावी विद्यार्थ्यांची शाळा सुरू करणेबाबत पालकांचा अभिप्राय मागवत आहेत. त्यामुळे जोपर्यंत कोरोना आटोक्यात येत नाही तोपर्यंत आम्ही मुलांना हायस्कूलमध्ये पाठविणार नसल्याचा निर्धार मडुऱ्यातील पालकांनी केला आहे. तसेच 31 डिसेंबर रोजी परिस्थितीचा आढावा घेऊन पुन्हा पालक सभा घेऊन शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेऊ असे सर्वानुमते ठरविण्यात आले.  राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग सोमवार 23 रोजीपासून सुरू करण्यासंदर्भात प्रशासनाच्या परिपत्रकानुसार न्यु इंग्लिश स्कूल मडुरा प्रशालेत पालक, शालेय समिती सदस्य व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सभा शनिवारी पार पडली. यावेळी मुख्याध्यापक सदाशिव गवस, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, शालेय समिती सदस्य खेमराज भाईप, मंगल कामत, बाळू परब, प्रकाश गावडे तसेच विजय वालावलकर, नितीन नाईक असे सुमारे 90 पालक उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. दिल्लीतील कोरोनाच्या लाटेपाठोपाठ महाराष्ट्रातही दुसरी लाट येऊ शकते अन् ती लाट महागात पडू शकते अशी भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच व्यक्त केली आहे. त्यामुळे शिक्षणविभाग किंवा सरकार स्वतः विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी न घेता पालकांच्या सहमतीने विद्यार्थ्यांना शाळेत बोलाविण्याचा घाट घालत आहे. जोपर्यंत प्रशासन, शाळा, आरोग्य यंत्रणा विद्यार्थ्यांची जबाबदारी घेत नाही तोपर्यंत आम्ही पालक मुलांना शाळेत पाठविण्यास सहमत नसल्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे, रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी सांगितले.  31 डिसेंबर रोजी पुन्हा बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेत योग्य तो निर्णय घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. 

You cannot copy content of this page