मुख्य विश्वस्त सुगंधा सावंत,माजी मुख्याध्यापक दिलीप कारेकर यांची मागणी;शंकर महादेव विद्यालय कुंभवडे वाचवण्यासाठी माजी विद्यार्थी, गावकरी, सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा..
*💫कणकवली दि.२२-:* कुंभवडे येथील शंकर महादेव विद्यालय व गुरुकुल संस्थाचालकांच्या चुकीच्या कारभारामुळे अडचणीत आहे.या स्कूल मधील मुलांची पटसंख्या कमी झाली आहे. अवास्तव खर्च वेगवेगळ्या कारणाने लावून संस्थेत भ्रष्टाचार केला जात आहे. त्यामुळे संस्था चालकांनी राजीनामा देऊन बाहेर पडावे ज्या उद्देशाने आम्ही संस्था चालू केली. त्या उद्देशाने आम्ही पुन्हा विद्यार्थ्यांच्या सहकार्याने संस्था चालवणार आहोत. येत्या पंधरा दिवसात जर संस्थाचालकानी राजीनामे दिले नाहीत. तर स्थानिक आमदार नितेश राणे यांचा पाठिंबा घेऊन मनमानी कारभाराविरोधात कायदेशीर लढाई करणार असल्याची माहिती मुख्य विश्वस्त सुगंधा सावंत,माजी मुख्याध्यापक दिलीप कारेकर यांनी दिली.
कणकवली येथील हॉटेल साई पॅलेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी विद्यार्थी प्रणाम कामत, महेश नार्वेकर व गावातील गावकरी उपस्थित होते.
गेले वीस ते बावीस वर्ष या संस्थेत काम करणाऱ्या संस्थाचालकांनी अनेकदा मला अपमानीत केले आहे. वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम करत असताना खोटी बिले लावून संस्थेच्या पैशाचा दुरुपयोग केला.विचारणा केली तेव्हा तुमचा सबंध काय? अशी विचारणा केली. आता विद्यार्थी पटसंख्या घटत आहे, संस्था चालविण्यासाठी लागणारा खर्च जमा होत नसल्यामुळे संस्था डबघाईला आली आहे. या संस्थेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा वापर संस्थेचे सचिव शशी सावंत वैयक्तिक कामासाठी करत आहेत. अनेक शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना सातत्याने अपमानाची वागणूक दिली आहे. संस्थाचालकांनी स्वतःहून राजीनामे द्यावेत.
मुख्याध्यापकांना अंधारात ठेवत विविध विषयांसाठी शिक्षक भरती करण्यात आली.त्यात मोठा भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे.त्याचबरोबर संस्था चालवताना या संस्थेचे संस्थापक कै. एस.एम.सावंत यांच्या उद्देशाला फाटा देण्याचं काम आताचे संस्थाचालक करत आहे. याबाबत अनेकदा संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अरविंद सावंत यांच्याकडे ही अनेकदा दाद मागूनही दुर्लक्ष करण्यात आला.त्यांना संस्था कशी चालते याबाबत पाहण्यासाठी वेळ नाही. एक प्रकारचे गैरव्यवहार या संस्थेत केले जात आहे,संस्था आणि गुरुकुल वाचवण्यासाठी मी आता लढा उभारणार असल्याचा इशाराही मुख्य विश्वस्त सुगंधा सावंत,माजी मुख्याध्यापक दिलीप कारेकर यांनी दिला.